Kolhapur job scam | नोकरीच्या आमिषाने 42 लाखांची फसवणूक : सूत्रधारासह दोघांना अटक 
कोल्हापूर

Kolhapur job scam | नोकरीच्या आमिषाने 42 लाखांची फसवणूक : सूत्रधारासह दोघांना अटक

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासह शासकीय विभागात कायमस्वरूपी नोकरीच्या बहाण्याने उच्चशिक्षित तसेच गरजू उमेदवारांना 42 लाख 80 हजारांचा गंडा घालून फसवणूक करणार्‍या दोघांना जुना राजवाडा पोलिसांनी सोमवारी सायंकाळी अटक केली. राजेंद्र मनोहर पाटील (वय 70, रा. महादेवनगर, फुलेवाडी, कोल्हापूर), राजू दत्तात्रय सरनाईक (रा. फुलेवाडी, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत.

मुख्य संशयित राजेंद्र पाटील याच्यासह त्याचा साथीदार राजू सरनाईक याने फिर्यादी संजय वसंतराव सनगर यांच्या मुलासह चार तरुणांना नोकरीच्या आमिषाने 42 लाख 80 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीला आला आहे. सनगर यांनी दोन दिवसांपूर्वी संशयितांविरुद्ध जुना राजवाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन रीतसर फिर्याद दाखल केली आहे.

एप्रिल 2014 ते आजअखेर वेळोवेळी संशयित पाटील, सरनाईक याने स्वत:च्या घरी, नवीन वाशी नाका, फुलेवाडी रिंगरोड या परिसरात पैसे उकळल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संशयितांनी सनगर यांच्याकडून 10 लाख 60 हजार, एकनाथ ज्ञानू गडकर (रा. सडोली दुमाला) यांच्याकडून 13 लाख 54 हजार, प्रकाश भडंगकर यांच्याकडून 8 लाख 70 हजार रुपये उकळल्याचे पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांनी सांगितले.

संशयितांनी कोल्हापूरसह ग्रामीण भागातील अनेक गरजू उमेदवाराकडून नोकरीच्या आमिषाने पैसे उकळले असावेत, असा तपासाधिकार्‍यांचा संशय आहे. फसगत झालेल्या तरुणांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असेही आवाहनही निरीक्षक लोंढे यांनी केले आहे. संशयितांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT