कोल्हापूर : गोकुळला प्रतिदिन ३० लाख लिटर दूध पुरवठा करतो. २० लाख लिटर संकलनाचा टप्पा आमच्यामुळे पूर्ण झाला. दूध संस्थांवर अनेक संसार अवलंबून आहेत. राजकारणातून संस्था मोडीत काढणार असाल, तर ते खपवून घेणार नाही. सभासदत्त्व रद्दच्या प्रशासकांनी काढलेल्या बेकायदेशीर नोटिसा रद्द करा, अन्यथा पुढच्यावेळी जनावरे, शेणाची पाटी घेऊनच येऊ, असा इशारा दूध संस्था प्रतिनिधींनी दिला.
सभासदत्त्व रद्दबाबत नोटीस बजावलेल्या ४१० दूध संस्थांनी गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालयात शनिवारी धडक दिली. प्रशासक, कार्यकारी संचालक उपस्थित नसल्याने त्यांनी गोकुळच्या दारातच ठिय्या मारत घोषणाबाजी केली. यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते.
महाव्यवस्थापक चौधरी यांना घेराव
महाव्यवस्थापक अनिल चौधरी यांनी निवेदन स्वीकारले; मात्र तत्काळ नोटीस रद्द करा, अशी मागणी करत संस्था प्रतिनिधींनी चौधरी यांना घेराव घातला. याबाबत निर्णय न झाल्यास प्रसंगी कार्यालयास कुलूप घालू, अशी भूमिका संस्था प्रतिनिधींनी घेतली.
...तर आम्ही सांगलीला येतो
चौधरी यांनी प्रशासक मालगावेंना फोनवरून संपर्क केला. यावेळी कागलचे विकास पाटील यांनी कायद्यातील कलमांचा चुकीचा वापर करून कारवाई होत आहे. दूध संस्थांचे सभासदत्व रद्द करण्याचा अधिकार प्रशासकांना आहे का, असा सवाल केला. तुम्ही येथे आल्याशिवाय प्रश्न मिटणार नाही. तुम्हाला जमत नसेल, तर आम्ही सांगलीला येतो असे सांगितले. सुनील पाटील यांनी आम्ही हलणार नाही, कोणाचे बरेवाईट झाले, तर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू, असा इशारा दिला.
नोटीस पाठवून महिलांचा अपमान केला. नोटीस मागे घ्या. अन्यथा आज केवळ प्रतिनिधी आलोय. उद्या सर्व महिला सभासदांना घेऊन मोर्चा काढण्याचा इशारा करंबळी येथील श्रीदेवी पाटील यांनी दिला.