कोल्हापूर

कोल्हापूर : 40 हजारांवर गणेशमूर्तींचे संकलन

backup backup

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा प्रदूषण रोखण्यासाठी नदी-तलावांमध्ये गणेशमूर्ती विसर्जनास मज्जाव केल्याने मूर्तिदानाला नागरिकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील पंचगंगा घाट, रंकाळा, कोटीतीर्थ राजाराम तलाव, राजाराम बंधारा आदींसह विविध ठिकाणी नैसर्गिक पावठ्यावर मूर्ती विसर्जन झाले नाही. सर्वच ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंडात मूर्ती विसर्जन झाल्याने शहरात इको-फ्रेंडली गणेश विसर्जन पार पडले. सोमवारी रात्री आठपर्यंत 28 हजार 258 मूर्ती दान केल्या. तर रात्री दहापर्यंत 40 हजारांवर मूर्ती संकलित झाल्या. या निमित्ताने सूज्ञ नागरिकांनी पर्यावरवणपूरक गणेशोत्सवास पाठबळ दिले. रात्री दहापर्यंत 135 टन निर्माल्य जमा झाले. विसर्जनासाठी परिसरात रात्री उशिरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा होत्या.

महापालिकेने मूर्तिदान उपक्रमाचे सुयोग्य नियोजन केले होते. प्रत्येक नैसर्गिक पाणवठ्यावर पोलिस बंदोबस्तासह महापालिका कर्मचारी नागरिकांना मूर्तिदानाचे आवाहन करीत होते. पंचगंगा घाट, रंकाळा इराणी खण, कोटीतीर्थ राजाराम तलाव, राजाराम बंधारा आदींसह शहरातील विविध भागात 180 ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड ठेवले होते. घरगुती गौरी-गणपती विसर्जनासाठी महापलिकेची यंत्रणा सक्रिय होती.

महापालिकेच्या पवडी विभागाचे 225 कर्मचारी, आरोग्य विभागाचे 650 कर्मचारी व आरोग्य निरीक्षकांची 16 पथके, 90 टेम्पो 200 हमालांसह, 10 डंपर, 24 ट्रॅक्टर-ट्रॉली व 5 जे.सी.बी., 7 पाण्याचे टँकर, 2 रोलर, 2 बूम अशा साधनसामग्रीच्या माध्यमातून गणेश विसर्जन पार पडले. सकाळपासून फारशी गर्दी नसल्याने सायंकाळी सहापर्यंत चार विभागीय कार्यालयांतर्गत एकूण 7 हजार 654 मूर्ती दान केल्या. यामध्ये गांधी मैदान 941, शिवाजी मार्केट 1880, राजारामपुरी 1509 आणि ताराराणी मार्केट 7654 मूर्ती दान केल्या.
सायंकाळी सहा ते आठपर्यंत गांधी मैदान 8 हजार 607, शिवाजी मार्केट 7 हजार 261, राजारामपुरी 6 हजार 373 आणि ताराराणी मार्केट 6 हजार 17 अशा एकूण 28 हजार 258 मूर्ती दान केल्या.

मूर्ती नेणार्‍या वाहनांना विलंब

दान केलेल्या मूर्ती इराणी खणीकडे नेण्यासाठी महापालिका यंत्रणा सतर्क होती. यासाठी मोठ्या संख्येने कर्मचारी आणि वाहने कार्यरत होती. मात्र, शहरात विविध मार्गांवर गणेशभक्‍तांची झालेली प्रचंड गर्दी, वाहतूक कोंडी, आणि गणेशमूर्ती सुरक्षितपणे उतरून घेण्यास लागणारा वेळ यामुळे अनेक भागांत मूर्ती नेण्यासाठी वाहने येण्यास विलंब होत होता. त्यामुळे काही ठिकाणी बराचवेळ गणेशमूर्ती दिसत होत्या. याबद्दल नागरिकांतून नाराजीचा सूर उमटला. मात्र, संपूर्ण रात्रभर महापालिका यंत्रणेने दानमूर्ती नेण्याचे काम सुरूच होते.

अग्‍निशमन दलाचे युवकास जीवदान

पोहता न येणारा तरुण इराणी खणीत पडला. अग्‍निशमन दलाच्या जवानांनी त्याला तत्काळ बाहेर काढले. विजय दळवी (वय 22, रा. शुक्रवार पेठ) असे युवकाचे नाव आहे.

विसर्जनासाठी 83 लाखांचे स्वयंचलित यंत्र

इराणी खण येथे यावर्षी पहिल्यांदाच महापालिकेने गणेशमूर्ती विसर्जनासाठी 83 लाख रुपये खर्चून स्वयंचलित यंत्र ठेवले होते. यंत्राच्या सहाय्याने रात्री उशिरापर्यंत चार हजारांहून अधिक घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. राज्यात पहिल्यांदाच कोल्हापूर महापालिकेने अशा प्रकारचा गणेशमूर्ती विसर्जनासाठी उपक्रम राबविला होता. महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्यासह महापालिका, पोलिस अधिकारी नागरिकांना आवाहन करीत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT