कोल्हापूर : जिल्ह्यातील तब्बल 4 लाख 81 हजार नागरिकांची ई-केवायसी झालेली नाही. ई-केवायसीसाठी दिलेली 30 जूनपर्यंतच्या वाढीव मुदतीत ती झाली नाही, तर रेशनवरून मिळणारे मोफत धान्य बंद केले जाणार आहे. ई-केवायसी बंधनकारक केली असली, तरी त्यासाठी येणार्या अडचणींवर मात्र शासनाकडून उपाययोजना केल्या जात नसल्याने अनेकांसमोर समस्या निर्माण झाल्या आहेत.
रेशनवरून प्राधान्य कुटुंब योजना आणि अंत्योदय कार्डधारकांनाच दर महिन्याला मोफत धान्य दिले जात आहे. हे धान्य खरोखरच गरजूंना मिळावे, त्याचा काळाबाजार कमी व्हावा, याकरिता केंद्र शासनाने मोफत धान्य मिळणार्या लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता आतापर्यंत सुमारे पाच वेळा मुदतवाढ दिली; मात्र या मुदतीत संपूर्ण लाभार्थ्यांची केवायसी झालेलीच नाही.
दि. 30 एप्रिल 2025 पर्यंतची असणारी मुदत संपल्यानंतर आता 30 जूनपर्यंत अंतिम मुदतवाढ दिली आहे. या दोन महिन्यांत जिल्ह्यातील 4 लाख 81 हजार 267 जणांना ई-केवायसी करून घ्यावी लागणार आहे. जिल्ह्यात या दोन्ही योजनांतून एकूण 25 लाख 22 हजार 155 जणांना धान्य मिळते. यापैकी 20 लाख 40 हजार 888 जणांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. सुमारे 19.08 टक्के म्हणजेच 4 लाख 81 हजार 267 जणांची ई-केवायसी प्रलंबित आहे.
ई-केवायसी करताना अडचणींचाही सामना करावा लागत. याबाबत दुकानदारांकडून वारंवार आंदोलन केली जात आहेत; मात्र राज्य शासनाकडून म्हणाव्या तशा उपाययोजना करण्याबाबत गतीने पावले उचलली जात नसल्याचेच चित्र आहे. यामुळे अनेकांची ई-केवायसी प्रलंबित आहे.
सर्व्हर डाऊन : सर्व्हर डाऊन ही ई-केवायसीतील मोठी अडचण आहे. नागरिक दुकानात जातात आणि सर्व्हर डाऊन होतो. अनेकदा तासन् तास थांबूनही तो सुरू होत नाही. लोक कंटाळून परत जातात. त्यापैकी अनेकजण महिनोंमहिने परत दुकानात येतच नाहीत.
ठसे जुळेनात : ई-पॉस मशिनवर ही ई-केवायसी करावी लागते. त्या ई-पॉस मशिनवर लहान मुले, वृद्ध तसेच कष्टकर्यांच्या हातांचे ठसे जुळताना अडचणी येत आहेत. वारंवार प्रयत्न करूनही ठसेच जुळत नसल्याने ई-केवायसी होत नसल्याचेही चित्र अनेक ठिकाणी आहे.
काहींची मनमानी : कोणत्याही रेशन दुकानात ई-केवायसी करता येते; मात्र अन्य दुकानांतील नागरिकांची ई-केवायसी करून न देणे, ठरावीक वेळेतच येणे, रेशन कार्डवर नावे असलेल्या सर्वांनी एकत्रच येणे असेही काही दुकानदार मनमानी करत आहेत. काही ठिकाणी पैशाचीही मागणी होत आहे.
ई-केवायसी करण्यात कोल्हापूर जिल्हा राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर भंडारा, दुसर्या क्रमांकावर गोंदिया, तर तिसर्या क्रमांकावर सातारा जिल्हा आहे. पाचव्या स्थानावर नाशिक जिल्हा आहे.