कोल्हापूर

कोल्हापुरात 37 ठिकाणी टँकरने पुरवठा पाण्याचा ठणठणाट!

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहरात सोमवारी दिवसभर पाण्याचा ठणठणाट होता. त्यामुळे महिलावर्गाचे हाल झाले. महापालिकेच्या वतीने आठ टँकरद्वारे 37 ठिकाणी पाणीपुरवठा करण्यात आला. टँकरचे पाणी घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. दरम्यान, शिंगणापूर योजनेतील गळती काढण्याचे काम सोमवारी अपूर्ण राहिले. मंगळवारी पुन्हा काम सुरू केले जाणार आहे. त्यामुळे मंगळवारी (दि. 18) शहरातील बहुतांश भागांत पाणीबाणी जाणवण्याची शक्यता आहे.

शिंगणापूर योजनेच्या मुख्य जलवाहिनीला दत्तनगर-शिंगणापूर येथे मोठी गळती लागली आहे. त्यासाठी सोमवारी शिंगणापूर उपसा केंद्र बंद ठेवण्यात आले होते. गळती काढण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात खोदाई करण्यात आली. परंतु, दिवसभरात गळती सापडली नाही. तसेच श्री लॉन येथे जलवाहिनीला दोन ठिकाणी गळती लागली आहे. त्यापैकी एक गळती काढण्यात महापालिका कर्मचार्‍यांना यश आले.

पाणीपुरवठा विभागाच्या वतीने शहरातील कोटीतीर्थ, राजारामपुरी, भेंडे गल्ली, राजेंद्रनगर, रूईकर कॉलनी, बेलबाग, शिवाजी पार्क, शाहू पार्क, महाडिक वसाहत, नेहरूनगर, शास्त्रीनगर, मटण मार्केट परिसर, सणगर गल्ली आदीसह इतर ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. महापालिकेच्या चार आणि भाडेतत्त्वावर घेतलेल्या 4 टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला.

SCROLL FOR NEXT