तंबाखूजन्य पदार्थ 
कोल्हापूर

तंबाखूजन्य पदार्थ, शीतपेयांसाठी 35 टक्के जीएसटी

मंत्रिगटाची शिफारस; 21 डिसेंबरला जीएसटी परिषदेच्या बैठकीत होणार फैसला!

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : मानवी आरोग्याला अपाय करणार्‍या तंबाखूजन्य उत्पादनांवर आता 28 टक्क्यांऐवजी 35 टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) आकारण्याचा प्रस्ताव तयार झाला आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील वस्तू व सेवा कराच्या मंत्रिगटाने तशा आशयाची शिफारस जीएसटी परिषदेला केली आहे. याखेरीज शीतपेयांनाही 35 टक्क्यांच्या नव्या कर टप्प्यामध्ये आणण्यात येणार आहे. या प्रस्तावाला जीएसटी परिषदेने हिरवा कंदील दाखविला तर नव्या वर्षाच्या आरंभापासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली राजस्थानातील जैसलमेर येथे 21 डिसेंबर रोजी जीएसटी परिषदेची बैठक होते आहे. या परिषदेच्या कार्यपटलावर हा विषय समाविष्ट करण्यात येणार आहे. याखेरीज मंत्रिगटाने केलेल्या शिफारशीनुसार चमड्याच्या बॅग्ज, सौंदर्यप्रसाधने, घड्याळे आणि चप्पल्स आदी चैनीच्या वस्तूंवर सध्या 18 टक्के जीएसटी आकारला जातो. तो वाढवून 28 टक्के करण्याचा प्रस्तावावरही निर्णय अपेक्षित आहे.

बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दिल्लीत मंत्रिगटाची बैठक झाली. या बैठकीत एकूण 148 वस्तूंवरील जीएसटी कर टप्प्यांच्या बदलाविषयी प्रस्ताव तयार करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने वस्त्रोद्योगाला केंद्रीभूत ठेवण्यात आले आहे. मंत्रिगटाने केलेल्या शिफारशीनुसार एक हजार 500 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या कपड्यांसाठी 5 टक्क्याचा जीएसटी, तर एक हजार 500 ते 10 हजार रुपयांपर्यंत आणि 10 हजार रुपयांवरील कपड्यांसाठी अनुक्रमे 18 व 28 टक्क्यांचा जीएसटी आकारणीचा प्रस्ताव आहे.

सध्या एक हजार रुपयांपर्यंतच्या कपड्यांसाठी 5 टक्के, तर त्यावरील किमतींच्या कपड्यांसाठी 12 टक्के असे दोनच कर टप्पे अस्तित्वात आहेत. मंत्रिगटाने उंची कपड्यांना उंची कर टप्प्याची शिफारस करून त्यांना चैनीच्या वस्तूंच्या यादीत समाविष्ट केले आहे. त्याचबरोबर 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमत असणार्‍या सायकलसाठी 12 टक्क्यांवरून 5 टक्के, तर 20 लिटरच्या मिनरल वॉटरच्या जारसाठी 18 टक्क्यांवरून 5 टक्के जीएसटी आकारण्याच्या शिफारशींचाही समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT