कोल्हापूर : कोल्हापुरात 35 किलो वजनाची सव्वाचार फूट उंचीची चांदीची गणेशमूर्ती तयार करण्यात आली आहे. चांदी कारागिरांनी ‘लालबागचा राजा’ रूपातील ही मूर्ती 25 दिवसांत बनवली असून, लवकरच मध्य प्रदेशमध्ये पाठवली जाणार आहे, अशी माहिती चांदी व्यावसायिक जयेश ओसवाल, शैलेश ओसवाल व वैभव ओसवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ओसवाल म्हणाले, मध्य प्रदेशातील एका व्यापार्याला 35 किलो वजनाची चांदीची गणेशमूर्ती बनवून हवी होती. त्यासाठी त्यांनी संपर्क साधला. चांदीची मूर्ती बनवण्याआधी प्लास्टर ऑफ पॅरिसची सुबक मूर्ती बनवून त्याचे मोल्ड काढले. त्यानंतर डाय, चांदीची आटणी, पाष्टा, बेट काम, कटिंग आणि जोडकाम झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यात मूर्तीवर नक्षीकाम करण्यात आले. सव्वाचार फूट उंचीची ‘लालबागचा राजा’च्या रूपातील आकर्षक अशी ही चांदीची मूर्ती साकारली. यासाठी दोन चांदी कारागिरांनी काम केल्याचे त्यांनी सांगितले.