कोल्हापूर : कोल्हापूर, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटकातून महागड्या दुचाकी, मोपेड चोरणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषणने मंगळवारी बेड्या ठोकल्या. संग््रााम शिवाजी गायकवाड (वय 46, रा. तिसरी गल्ली, रुकडीवाडी, ता. हातकणंगले, मूळ रा. मुरगूड, ता. कागल) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून 17 लाख रुपये किमतीची 34 वाहने हस्तगत करण्यात आली आहेत.
चोरीच्या गुन्ह्यातील दुचाकी, मोपेडची खरेदी करणाऱ्या चौघांवर गुन्हे दाखल करून त्यांनाही सहआरोपी करण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी सांगितले. त्यामध्ये कुणाल मनोहर कांबळे (रा. रुकडी, ता. हातकणंगले), सुनील रमेश खोत (माणगाववाडी, ता. हातकणंगले), पांडुरंग शिवाजी रानमळे (रा. परीट गल्ली, मुरगूड, ता. कागल), संजय रामचंद्र शिंदे (रा. ज्ञानेश्वर कॉलनी, मुरगूड) यांचा समावेश आहे.
संशयितांकडून जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील 8, कोडोली (2), भुदरगड (4), शाहूपुरी, कोल्हापूर (3) याशिवाय हुपरी, कागल, शहापूर, हातकणंगले, गोकुळ शिरगाव, मुरगूड, गावभाग इचलकरंजी, शिवाजीनगर, इश्वरपूर व चिक्कोडी येथील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीला आले आहेत. याशिवाय आलिशान मोटार चोरीचेही गुन्हे उघड होण्याची शक्यता असल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले. यावेळी अपर पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू उपस्थित होते. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सुशांत चव्हाण, सहायक निरीक्षक सागर वाघ, शेष मोरे यांच्यासह पथकाने कामगिरी केल्याचेही पोलिस अधीक्षक गुप्ता यांनी सांगितले. संशयित गायकवाड याच्या कारनाम्यांची माहिती मिळताच हेर्ले (ता. हातकणंगले) येथे सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. कब्जातील दुचाकीही चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.