कोल्हापूर

कोल्हापूर : 300 कोटी एफआरपी थकीत

Arun Patil

कुडित्रे, प्रा. एम. टी. शेलार : कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गळीत हंगाम काही अपवाद वगळता अंतिम टप्प्यात असून 15 मार्च 2023 अखेर ऊस उत्पादकांची 300 कोटी 44 लाख रुपयांची एफआरपी थकीत आहे. खासगी व सहकारी अशा मिळून 22 साखर कारखान्यांपैकी फक्त 13 साखर कारखान्यांनी 100 टक्के एफआरपी दिली असून उर्वरित 9 साखर कारखान्यांनी केवळ 37 ते 84 टक्केपर्यंत एफआरपी दिलेली आहे.

या गळीत हंगामात कोल्हापूर जिल्ह्यात 13 सहकारी व 9 खासगी अशा एकूण 22 साखर कारखान्यांनी गळीत हंगाम घेतला असून 28 फेब्रुवारी 2023 अखेर कोल्हापूर जिल्ह्यात एकूण एक कोटी 42 लाख 88 हजार 201 मे. टनाचे गाळप झालेले असून आजपर्यंतचा सरासरी साखर उतारा 12.49 टक्के आहे.

छत्रपती शाहू (कागल), छत्रपती राजाराम (कसबा बावडा), दत्त शेतकरी (शिरोळ), दूधगंगा वेदगंगा (बिद्री), कल्लाप्पा आवाडे जवाहर, रत्नाप्पा कुंभार पंचगंगा, शरद (नरंदे), अथणी शुगर (बांबवडे), दत्त दालमिया (आसुर्ले पोर्ले), इकोकेन (म्हाळुंगे), अथणी शुगर (तांबाळे), अथर्व इंडस्ट्रीज (हलकर्णी), ओलम ग्लोबल (राजगोळी) या 13 साखर कारखान्यांनी 90 ते 100 टक्के एफआरपी दिलेली आहे.
उरलेल्या नऊ साखर कारखान्यांची

15 मार्चअखेर थकबाकी लाखात…

सरसेनापती संताजी घोरपडे (2590.48), आजरा (1563.76), भोगावती (8965.17), सदाशिवराव मंडलिक (2958.32), कुंभी कासारी (3714.36), पद्मश्री डी. वाय. पाटील (1769.18), गुरुदत्त टाकळीवाडी (2534.70), रिलायबल शुगर फराळे (17.18).

राज्यात 134 कारखान्यांकडून 2,658 कोटी रूपये थकीत राशिवडे : प्रवीण ढोणे

चालु गळीत हंगामामध्ये फेब्रुवारी अखेर राज्यातील 199 साखर कारखान्यांपैकी 134 कारखान्यांनी 2 हजार 658 कोटीची एफआरपी थकविली आहे. तर 65 साखर कारखान्यांनी पूर्णपणे एफआरपी अदा केली आहे. हंगाम अंतिम टप्प्यात असताना एफआरपी अदा करण्यासाठी आर्थिक कसरत करावी लागत आहे. तर चालू हंगाम अंतिम टप्प्यात आला असून महिनाभर आधीच धुराडी बंद होणार आहेत.

चालू ऊस गळीत हंगामामध्ये राज्यातील 199 सहकारी व खासगी कारखान्यांनी सहभाग घेतला. सध्या हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. बहुतांश कारखान्यांनी कार्यक्षेत्रातील उसाचे गाळप करत टार्गेट पूर्ण करत हंगाम संपविला आहे. फेब्रुवारीअखेर 27,443 कोटी एफआरपीपैकी 25,399 कोटी एफआरपी अदा केली आहे; तर 134 कारखान्यांकडून 2658 कोटीची एफआरपी थकीत आहे. 67 कारखान्यांनी 80 ते 99 टक्के, 39 कारखान्यांनी 60 ते 79 टक्के तर 28 कारखान्यांनी 59 टक्के एफआरपी अदा केली आहे. यामध्ये कोल्हापूर, सांगली, पुणे, अहमदनगर जिल्ह्यांतील कारखान्यांनी 100 ते 80 टक्क्यांपर्यंत एफआरपी अदा केली आहे. उसाअभावी चालू गळीत हंगाम महिनाभर आधीच समाप्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची पूर्ण एफआरपी अदा करण्यासाठी कारखानदारांना आर्थिक जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT