इचलकरंजी : चंदूर (ता. हातकणंगले) येथे भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात बकर्यांची 30 पिल्ले ठार झाली. तसेच या हल्ल्यात चार बकरी गंभीर जखमी आहेत. ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास आकमान मळ्यात घडली. घटनास्थळी वन विभागाच्या पथकाने पाहणी करून पंचनामा केला. महादेव माव्यापा पुजारी यांनी तक्रार दिली आहे.
दरम्यान, पुजारी यांनी हिंस्र वन्य प्राण्यांकडून हल्ला झाल्याचा आरोप केला आहे. तर वन विभागाने वन्य प्राण्याच्या पाऊलखुणा घटनास्थळी आढळल्या नसल्याचे सांगितले. चंदूर येथील महासिद्ध मंदिराच्या पिछाडीस आकमान मळा येथे महादेव यांच्या बकर्यांची 45 पिल्ली त्यांनी तीन दिवसांपासून लोखंडी डालग्यामध्ये बसवली होती. शुक्रवारी मध्यरात्री भटक्या कुत्र्यांनी या पिल्लांवर हल्ला केला. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. वनपाल संजय कांबळे, वनरक्षक मंगेश वंजारे, पशु वैद्यकीय अधिकारी मनीषा चाफेकर, तलाठी राजू माळी, पोलिसपाटील राहुल वाघमोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. यावेळी हातकणंगले पंचायत समिती माजी सभापती महेश पाटील, यशवंत क्रांती संघटना अध्यक्ष संजय वाघमोडे, ग्रामपंचायत सदस्य मारुती पुजारी, प्रकाश पाटील, संजय पाटील, अण्णाप्पा पुजारी उपस्थित होते.