मयत रोहन लोहार, शुभम धावरे आणि आकाश परिट.  (Pudhari Photo)
कोल्हापूर

सरवडे- मांगेवाडी दरम्यान भीषण अपघात, सोळांकूर येथील ३ तरुणांचा जागीच मृत्यू

Kolhapur News | ऐन गणेशोत्सवात सोळांकूर गावावर शोककळा

पुढारी वृत्तसेवा

सरवडे; पुढारी वृतसेवा

सरवडे-मांगेवाडी (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) दरम्यान शिवमुद्रा हॉटेल जवळ रात्री १२:३० च्या सुमारास बोलेरो ( क्रं. एम एच ४२ एच ३०६४) गाडीला ट्रकने ( क्रं. केए २८ ए ए ८२०६) जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात सोळांकूर येथील ३ युवकांचा जागीच मृत्यू झाला. तर चौघे गंभीर जखमी झाले असून त्यांना कोल्हापूर येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची राधानगरी पोलीस ठाण्यात नोंद केली आहे. या अपघाताने ऐन गणपती उत्सवात गावावर मोठी शोककळा पसरली असून गावात सन्नाटा पसरवला आहे. (Kolhapur News)

घटनास्थळी आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, निपाणी- राधानगरी महामार्गावरील सरवडे- मांगेवाडी दरम्यानच्या एका हॉटेल जवळ रात्री १२:३० च्या सुमारास गारगोटीहून सोळांकूरकडे येणाऱ्या बोलेरो गाडीला कोकणातून आलेल्या मालवाहतूक करणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. यात बोलेरो गाडीतील शुभम चंद्रकांत धावरे (वय २८), आकाश आनंदा परीट (वय २५) आणि रोहन संभाजी लोहार (वय २४) या युवकांचा जागीच मृत्यू झाला. तर ऋत्विक राजेंद्र पाटील, सौरभ सुरेश तेली, भरत धनाजी पाटील आणि संभाजी हणमंत लोहार हे गंभीर जखमी झाले आहेत.

ट्रकचालक घटनास्थळावरुन ट्रकसह पसार, पण...

हा अपघात एवढा गंभीर होता की, बोलेरो गाडी अक्षरशः चक्काचूर झाली आहे. अपघात गंभीर होऊनही ट्रकचालक घटनास्थळावरुन ट्रकसह पसार झाला. परंतु जखमींना घेऊन जाणाऱ्या शासकीय रुग्णवाहिकेतील लोकांनी हा ट्रक पाहून इस्पुर्ली (ता. करवीर) येथील पोलीस ठाण्याजवळ हा ट्रक ओळखला आणि ट्रकचालक गड्ड्याप्पा परशुराम राठोड (वय ४२, रा. यादगीर, कर्नाटक) याला पोलीसांच्या ताब्यात दिले.

बोलेरो गाडीला धडक दिलेला ट्रक.

सोळांकूर येथील ६ युवक काही कामानिमित्त दुपारी गारगोटी येथे गेले होते. ते काम आटोपून रात्री उशिरा घरी परत येत असताना मुदाळ तिठ्ठा येथे भजनासाठी गेलेले तबला वादक संभाजी लोहार हेही गाडीत बसले. पुढे सरवडे -मांगेवाडी दरम्यान या युवकांवर ऐन गणपती उत्सवात काळाने घाला घातला. ट्रकने एवढी जोरदार धडक दिली होती की, गाडी आणि रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. तर बोलेरो चालक शुभम धावरे याचे शीर धडावेगळे झाले होते. घटनास्थळी अंगावर शहारे आणणारे चित्र दिसले.

सोळांकूर गावावर शोककळा, कुटुंबीयांचा आक्रोश

घटनास्थळी पोलीस उपअधिक्षक आप्पासो पवार, पोलीस निरीक्षक संतोष गोरे, उपनिरीक्षक महेश घिर्डीकर, पोलीस अंबुलकर यांनी पंचनामा केला. यानंतर मयत तिघांवर ग्रामीण रुग्णालय सोळांकूर येथे शवविच्छेदन करुन मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी व ग्रामस्थांनी केलेल्या आक्रोशाने रुग्णालय परिसर स्तब्ध झाला. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. संपूर्ण व्यवहार बंद ठेवून व दुखवटा पाळून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

शुभम धावरे याच्या मागे आईवडील आणि विवाहित बहीण, आकाश परीट यांच्या मागे आई-वडील, भाऊ, दोन विवाहित बहिणी तर रोहन लोहार याच्या मागे आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.

मयत रोहन लोहार, शुभम धावरे आणि आकाश परिट.
जखमींची नावे- भरत पाटील, सौरभ तेली आणि ऋत्विक पाटील.

निपाणी- देवगड मार्गावर अपघात वाढले, कारण काय?

निपाणी- देवगड दरम्यानच्या रस्त्यासाठी अंदाजे २३० कोटी रुपये खर्च केले आहेत. या रस्त्याचे रुंदीकरण होऊनही रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेतकऱ्यांनी हत्ती गवताची मोठ्या प्रमाणावर लागण केली आहे. यामुळे वळण रस्त्यावर या हत्ती गवतामुळे समोरुन येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नसल्यामुळे अनेक लहान- मोठे अपघात घडले आहेत. तरीही याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे. आजच्या अपघातालाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आणि हत्ती गवत कारणीभूत असल्याचे उपस्थितांनी सांगितले. यामुळे आतातरी सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT