घुणकी : पुणे-बंगळूर महामार्गावरील किणी टोल नाका ते घुणकी ओढ्याच्या पुलादरम्यान झालेली वाहतूक कोंडी.  (छाया : ऋग्वेद चौगुले)
कोल्हापूर

Highway Traffic Jam | पुणे-बंगळूर महामार्गावर तीन किमी वाहनांच्या रांगा

घुणकी ओढ्याजवळ वाहतूक ठप्प; सुमारे ४५ हजार वाहनांनी केला टोल पार

पुढारी वृत्तसेवा

पेठवडगाव : दिवाळीच्या सुट्ट्या संपवून परतीच्या प्रवासाला निघालेले पर्यटक आणि वाढलेली वाहनांची संख्या यामुळे रविवारी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीचा अक्षरशः बोजवारा उडाला. घुणकी ओढ्याजवळ दिवसभर वाहतूक ठप्प झाली, तर तीन किलोमीटरहून अधिक अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. रात्री दहाच्या सुमारास किणी टोल नाका ते घुणकी ओढ्यापर्यंतचा रस्ताही वाहनांनी `पॅक` झाला. सेवा रस्त्यावरही वाहतुकीची कोंडी झाली.

दिवाळी सणानिमित्त गावी आलेले चाकरमानी तसेच सणानंतर पर्यटनासाठी बाहेर पडलेले पर्यटक आता परतीच्या प्रवासाला लागले आहेत. त्यामुळे पुणे-बंगळूर महामार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच महामार्गाच्या विस्तारीकरणाची कामे संथगतीने सुरू असून अनेक ठिकाणी पुलांची कामे अद्याप अपूर्ण आहेत. सेवा रस्त्यांवरील वाहतूक वळविण्यासाठी करण्यात आलेली डायव्हर्जन आणि महामार्गावरील खड्डे यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे.

घुणकी ओढ्यावरील पुलाचे काम अपूर्ण असल्याने अरुंद मार्गावरून दोन्ही बाजूंची वाहतूक सुरू आहे. पुलावरील खड्डे आणि वाहनांची वाढलेली संख्या यामुळे वाहतुकीचा वेग अत्यंत संथ होता. परिणामी, पुलाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. बराच वेळ वाहतूक ठप्प राहिल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. किणी टोल नाक्यावर वाहनांची प्रचंड गर्दी झाली होती. दिवसभरात चाळीस हजारांहून अधिक कार आणि चार हजारांहून अधिक अवजड वाहनांनी टोल नाका पार केला. टोल नाक्यावर महिन्यापूर्वी बसविण्यात आलेली सिस्टीम सातत्याने व्यवस्थित कार्यरत नसल्यामुळे फास्टॅग रीड होण्यात अडचणी येत होत्या.

टोल वसुली सुरू; सुविधांचा मात्र अभाव

महामार्गावरील अपूर्ण कामे, ठिकठिकाणी केलेली वाहतूक वळविण्याची व्यवस्था आणि खड्ड्यांमुळे वाहनधारकांना रोजच कोंडीचा सामना करावा लागत आहे. असे असतानाही टोल वसुली मात्र नियमित सुरू आहे. महामार्गाची अपूर्ण कामे, अरुंद पूल, खड्डे आणि अपुऱ्या वाहतूक नियोजनाचा फटका प्रवाशांना बसत आहे. महामार्गावर वाहतुकीचे प्रभावी नियोजन नसल्याने टोल भरूनही सुरक्षित आणि विनाअडथळा प्रवास मिळत नसल्याची नाराजी वाहनधारकांतून व्यक्त होत आहे.

गुगलचा मार्गही कोंडीत..

टोल नाक्याच्या पुढे वाहतूक कोंडी झाल्याचे समजताच अनेक वाहनचालकांनी गुगल मॅपचा आधार घेत किणी-भादोले-शिगावमार्गे तांदूळवाडी गाठण्याचा प्रयत्न केला. काही वाहनचालकांनी घुणकी गावातून जाणारा पर्यायी मार्ग निवडला. मात्र, घुणकीतील अंतर्गत रस्त्यांची पुरेशी माहिती नसल्याने आणि योग्य मार्ग न मिळाल्याने अनेक वाहने गावाच्या परिसरातच फिरताना दिसत होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT