कोल्हापूर : दख्खनचा राजा जोतिबा मंदिर परिसरातील शिलालेख.  
कोल्हापूर

Jyotiba Temple | जोतिबा डोंगरावरील २८६ वर्षांपूर्वीच्या शिलालेखाचा उलगडा

मंदिरातील ओवरीच्या बांधकामासंदर्भातील माहिती

पुढारी वृत्तसेवा

सागर यादव

कोल्हापूर : वाडी रत्नागिरी तथा जोतिबा डोंगरावरील दख्खनचा राजा जोतिबा मंदिरातील २८६ वर्षांपूर्वीच्या शिलालेखाचा उलगडा झाला आहे. मंदिरातील ओवरीच्या बांधकामासाठी दिलेल्या दानासंदर्भातील माहिती या शिलालेखात आहे. शिलालेखाची पहिली ओळ प्लास्टरखाली गाडली गेली आहे. यामुळे याचे तातडीने जतन, संवर्धन, संरक्षण अत्यावश्यक आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील जोतिबा मंदिराच्या प्रांगणात असलेल्या हत्तीची ओवरीच्या ईशान्य दिशेला गुरवांच्या भिंतीखालील फरशीत हा शिलालेख कोरलेला आहे. हा लेख मंदिर नूतनीकरण करताना बांधकामात सापडला. शिलालेख शालिवाहन शक १६६२, रौद्री नाम संवत्सर, म्हणजे इ. स. १७४० च्या कालखंडातील असून, कोरीव स्वरूपाचा सात ओळींचा देवनागरी लिपीतील मराठी भाषेत कोरलेला आहे.

शिलालेख उघड्यावर असल्याने त्यावर वातावरणाचा परिणाम झाला आहे. शिलालेखाचे वाचन शिलालेख तज्ज्ञ अनिल किसन दुधाणे यांनी केले असून त्यांना कपिल ठाकरे, मेघराज बुने, डॉ. शैलेंद्र भांडारे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

शिलालेखाच्या सात ओळी आणि त्यांचा अर्थ असा...

[१. स्वस्ति श्री शालीवाहन, २. सके १६६२] रौ, ३. द्री नाम संवछरे,

४. नरसोजी बीन पद, ५. मोजी चौगुळा मो. मौ., ६. जे रेणवि कर्याति षाना-,

७. पुर मामळे मुर्तुज्याबद

अर्थ : शालिवाहन शकाच्या १६६२वर्षी रौद्री नाम संवत्सरात म्हणजेच इ. सन १७४० व्या वर्षी मौजे रेणवी येथील मोकादम पाटील नरसोजी, पदमोजी यांचे पुत्र, चौगुळा, कर्यात षाणापूर (खानापूर), मामले मुर्तुजाबाद (मिरज) यांनी जोतिबा मंदिरातील ओवरीसाठी काही दान किंवा बांधकाम केले असावे.

१८ व्या शतकातील स्थानिक प्रशासन, सामाजिक जीवन आणि धार्मिक परंपरा समजून घेण्यासाठी हे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक साधन आहे. यातून तत्कालीन ग्रामीण प्रशासनाची रचना, स्थानिक पदाधिकाऱ्यांचे सामाजिक स्थान तसेच त्या काळातील प्रशासकीय विभागणीची माहिती मिळते.
अनिल दुधाणे, शिलालेखतज्ज्ञ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT