कोल्हापूर : जोतिबा डोंगरावरील यमाई मंदिर परिसरातील मुरलीधर तलावाच्या दक्षिण दरवाजाजवळील शिलालेखाचा ठसा घेताना शिलालेख तज्ज्ञ अनिल दुधाणे. 
कोल्हापूर

Jyotiba Temple Murlidhar Lake | जोतिबा डोंगरावरील मुरलीधर तलावातील २८३ वर्षांपूर्वीच्या शिलालेखाचा उलगडा

करवीरचे छत्रपती संभाजी महाराज (दुसरे) आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई यांच्या लोकोपयोगी कार्यावर प्रकाशझोत

पुढारी वृत्तसेवा

सागर यादव

कोल्हापूर : वाडी रत्नागिरी म्हणजेच दख्खनचा राजा जोतिबा डोंगरावरील यमाई देवी मंदिराच्या बाजूला असणाऱ्या मुरलीधर तलावाच्या दक्षिण दरवाजाच्या डाव्या बाजूला असणाऱ्या २८३ वर्षांपूर्वीच्या शिलालेखाचा उलघडा संशोधकांनी केला आहे. करवीरचे छत्रपती संभाजी महाराज (दुसरे) आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई यांच्या लोकोपयोगी कार्यावर प्रकाशझोत टाकणारा हा शिलालेख आहे.

इसवी सन १८ व्या शतकातील कोरीव शिलालेख ९ ओळींचा देवनागरी लिपीतील मराठी भाषेत कोरलेला आहे. लेखाची शिळा अनेक वर्षे उघड्यावर असल्याने त्यावर वातावरणाचा परिणाम झाला असून लेखातील अक्षरे झिजून पुसट झाली आहेत. तर काही अक्षरे तुटली आहेत. शिलालेखाचे संशोधन पन्हाळगडावरील ज्येष्ठ इतिहास संशोधक कै. मु. गो. गुळवणी यांनी आपल्या कारकीर्दीत केले होते; मात्र त्याचे वाचन त्यांच्याकडून होऊ शकले नव्हते. शिलालेखाचा छाप घेतल्यानंतर शिलालेख तज्ज्ञ अनिल दुधाणे यांना हा वाचता आला. यासाठी त्यांना चैतन्य अष्टेकर, मेघराज बुने, आशिष कुलकर्णी, डॉ. शैलेंद्र भांडारे, श्री. वैभव राजे भोसले यांचे सहकार्य लाभले.

शिलालेखातील ९ ओळी

१. "श्रीगणेशाय नमः वाडी रत्नागिरी क्षेत्रे तेथे श्रीदेव

२. रवळ नाथ सुप्रसनु होऊनी तेथे तळ्यास काम लाविले.

३. श्रीदेवी यमाईच्या वनात तळ्यास काम लाविले।

४. मनो परलोकोपकारार्थी जीवन काम बांधिविले।

५. स्वस्ति श्री राज्यभिषेक शके १६६५ काळयुक्त नाम संव

६. त्सरे, कार्तिक शुद्ध त्रितीया स्थिरवासरे भोसले

७. कुलवंतास श्री राजा शंभू छत्रपती यांची धर्मपत्नी

८. सकल सौभाग्यवती वज्रचुडेमंडित उभयकुलवर्धिनी

९. जिजाबाईच्या हातून श्रीने तळे बांधविले असे || सुप्रसन्न।"

शिलालेखाचा अर्थ असा

वाडी रत्नागिरी या पवित्र क्षेत्रात श्री रवळनाथ देव प्रसन्न व्हावा म्हणून तळे बांधण्याचे काम हाती घेण्यात आले. तसेच श्रीदेवी यमाईच्या वनातील तळ्याचेही काम करण्यात आले. हे जलकार्य केवळ तत्कालीन लोकांच्या उपयोगासाठी नव्हे, तर परलोकातील पुण्यप्राप्ती आणि सर्वसामान्यांच्या उपकारासाठी करण्यात आले होते. शालिवाहन शक १६६५, कालयुक्त नाम संवत्सरे, कार्तिक शुद्ध तृतीया, रविवार म्हणजेच ९ ऑक्टोबर १७४३ रोजी, भोसले कुलवंतांस श्री राजा शंभू छत्रपती यांच्या धर्मपत्नी सकल सौभाग्यवती, वज्रचूडेमंडित, उभयकुलवर्धिनी जिजाबाई यांच्या हस्ते श्री रवळनाथाच्या क्षेत्रात तळे बांधण्यात आले. हे कार्य लोकांच्या उपयोगासाठी तसेच परलोकोपकारार्थ करण्यात आले होते.

शिलालेख मराठा कालखंडातील जलव्यवस्था, धार्मिक श्रद्धा, राजघराण्यातील स्त्रियांचे सामाजिक योगदान आणि लोककल्याणकारी कार्य यांचा महत्त्वपूर्ण प्राथमिक पुरावा आहे. तत्कालीन ग्रामीण समाजाच्या पाणीपुरवठा आणि जलसंधारणाच्या गरजांची प्रत्यक्ष साक्ष या लेखातून मिळते.
अनिल किसन दुधाणे, शिलालेख तज्ज्ञ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT