कोल्हापूर जिल्ह्यात वर्षभरात आढळले थॅलेसेमियाचे 25 रुग्ण rasslava
कोल्हापूर

World Thalassemia Day : कोल्हापूर जिल्ह्यात वर्षभरात आढळले थॅलेसेमियाचे 25 रुग्ण

सहा महिने ते दीड वर्षाच्या मुलांचा समावेश; एकूण रुग्णसंख्या 225, व्यापक जनजागृतीची गरज

पुढारी वृत्तसेवा
एकनाथ नाईक

कोल्हापूर ः थॅलेसेमिया आजाराशी झुंज देणार्‍या रुग्णांना प्रत्येकी 20 ते 25 दिवसांमध्ये कमीत कमी 1 युनिट रक्ताची गरज भासते. या आजारापासून बचावासाठी बोनमॅरो ट्रान्सप्लांट करावी लागते; परंतु त्यासाठी सहजासहजी डोनर उपलब्ध होत नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यात वर्षभरात तब्बल थॅलेसेमियाचे नवे 25 रुग्ण सापडले आहेत. यामध्ये नोंदणी असलेल्या रुग्णांची संख्या सुमारे 225 असल्याची माहिती सीपीआर प्रशासनाने दिली.

नवीन सापडलेल्या थॅलेसेमिया रुग्णांमध्ये 6 ते दीड वर्षाच्या मुलांचा समावेश आहे. थॅलेसेमिया रक्ताचा अनुवंशिक आजार आहे. यात रक्तातील हिमोग्लोबीन कमी होते. देशात दरवर्षी सुमारे 12 हजारांवर थॅलेसेमियाग्रस्त मुले जन्माला येतात. थॅलेसेमिया ‘मायनर’, ‘मेजर’ आणि ‘इंटर मीडिया’ असे प्रकार आहेत. मेजर स्वरूपातील थॅलेसेमियाग्रस्तांचे जगणे म्हणजे आयुष्यभर यातनाच सहन कराव्या लागतात. पंधरा दिवस किंवा दरमहा शरीरातील रक्त बदलणे हाच त्यांच्या जगण्याचा पर्याय आहे.

थॅलेसेमिया टाळण्यासाठी विवाहपूर्व रक्ताची चाचणी महत्वाची आहे. आई, वडील जेव्हा थॅलेसेमिया वाहक (मायनर) असतात. तेव्हा प्रत्येक गर्भवती मातेच्या पोटात तेव्हा प्रत्येक गर्भवती मातेच्या पोटात मेजर थॅलेसेमियाग्रस्त मूल जन्माला येण्याची शक्यता असते. मायनर थॅलेसेमिया हा लोकसंख्येच्या चार टक्के मुलांमध्ये आढळत असल्याचे रक्ततज्ज्ञांनी सांगितले. औषधोपचाराने हा आजार बरा होत नाही. फक्त जगण्यासाठी औषधे घ्यावी लागतात.

औषधांसाठी कसरत

औषधांनी थॅलेसेमिया बरा होत नाही. हे सर्वांना माहिती आहे, पण जगण्यासाठी जी औषधे लागतात ती मिळविण्यासाठी रुग्णांसह नातेवाईकांना कसरत करावी लागते. थॅलेसेमिया रुग्णांसाठी गरजेची असणारी केल्फ गोळीचा वारंवार तुटवडा असतो. त्यामुळे सोलापूर, सातारासंह कर्नाटक राज्यातील रुग्ण औषधांसाठी सीपीआरमध्ये धाव घेतात.?

जिल्ह्यात थॅलेसेमियाची रुग्णसंख्या 225 वर पोहोचली आहे. लहान मुलांमध्ये हा आजार आढळतो. मुलांच्या नख, जिभेवर पिवळटपणा, मुलांची वाढ न होणे, वजन न वाढणे, श्वास घेण्यास त्रास, पोटाला सूज येणे ही लक्षणे असतात. आजारावर मात करण्यासाठी बोनमॅरो ट्रान्सप्लांट हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे पालकांनी गांभीर्याने घेणे महत्त्वाचे आहे. विवाहापूर्वी थॅलेसेमियाची तपासणी करावी.
डॉ. वरुण बाफना हिमॅटॉलॉजिस्ट, सीपीआर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT