kolhapur | जि. प. 23, पं. स. चे 44 अर्ज अवैध Pudhari File Photo
कोल्हापूर

kolhapur | जि. प. 23, पं. स. चे 44 अर्ज अवैध

छाननीत 1,870 उमेदवारांचे अर्ज पात्र

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्हा परिषदेसाठी दाखल केलेल्या अर्जांपैकी एकूण 23, तर पंचायत समितीसाठी दाखल केलेल्या अर्जांपैकी एकूण 44 अर्ज गुरुवारी झालेल्या छाननीत अवैध ठरले. यामुळे जिल्हा परिषदेच्या 68 जागांसाठी 659, तर पंचायत समितीच्या एकूण 136 जागांसाठी 1,211 असे एकूण 1,870 अर्ज पात्र ठरले.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी चुरशीने उमेदवारी अर्ज दाखल झाले. दाखल अर्जांची गुरुवारी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांसमोर छाननी झाली. काही ठिकाणी उमेदवारांनी वकिलांची फौज उभी केली होती. बहुतांशी ठिकाणी कागदपत्रातील त्रुटी, सूचक, अनुमोदक आदी कारणांनी अर्ज अवैध ठरले.

शाहूवाडीत जिल्हा परिषदेतील एक, पन्हाळ्यात जिल्हा परिषदेतील दोन, पंचायत समितीचे 7, हातकणंगलेत जिल्हा परिषदेचे 11 तर पंचायत समितीचे 15, शिरोळमध्ये जिल्हा परिषदेचे 2, तर पंचायत समितीतील एक अर्ज अवैध ठरला. करवीरमध्ये जिल्हा परिषदेचे 3, तर पंचायत समितीचे 8 अर्ज, गगनबावड्यात पंचायत समितीसाठी दाखल केलेल्या अर्जांपैकी एक, राधानगरीत जिल्हा परिषदेचा एक, कागलमध्ये जिल्हा परिषदेचा एक, तर पंचायत समितीचे 6, भुदरगडमध्ये जिल्हा परिषदेचा एक, आजर्‍यात पंचायत समितीचे दोन, तर गडहिंग्लजमध्ये पंचायत समितीसाठी दाखल अर्जांपैकी 1 अर्ज अवैध ठरला.

माघारीकडे लक्ष

उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर माघारीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. शुक्रवार, दि. 23, शनिवार, दि. 24 व मंगळवार, दि. 27 रोजी दुपारी तीनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. यानंतरच जिल्ह्यातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. उमेदवारी अर्ज माघारीसाठी साम-दाम-दंड भेद नीतीचा अवलंब होण्याची शक्यता आहे. अडचणीचे ठरणार्‍या उमेदवारांची अर्ज मागे घेण्यासाठी आतापासूनच मनधरणी सुरू झाली आहे, तर काही ठिकाणी अशा उमेदवारांचे अर्ज कायम राहतील, यासाठीही प्रयत्न सुरू झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT