अक्षय चव्हाण Pudhari File Photo
कोल्हापूर

Murder Case | डोळ्यात का बघतोस, म्हणून तरुणाचा अमानुष खून

सपासप वार; कुरुंदवाडमधील थरार

पुढारी वृत्तसेवा

कुरुंदवाड : ‘डोळ्यात डोळे घालून का बघतोस?’ असे म्हणत झालेल्या वादातून एका 23 वर्षीय युवकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या थरारक घटनेने कुरुंदवाड शहर हादरले. सिद्धार्थ चौकात रविवारी (दि. 6) रात्री साडेअकराच्या सुमारास अक्षय दीपक चव्हाण (वय 23, रा. कुरुंदवाड) याच्यावर तिघांनी धारदार शस्त्राने सपासप वार करून त्याला जागीच ठार केले.

याप्रकरणी यश काळे (वय 19, रा. कुरुंदवाड), अमन जमीर दानवाडे (22, रा. इचलकरंजी) व श्रीजय बडसकर (22, रा. औरवाड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, केवळ एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरून हा खून झाला की, यामागे अन्य काही जुने वैमनस्य आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत.

नेमके काय घडले?

5 जुलै रोजी अक्षय चव्हाण आणि मुख्य संशयित यश काळे यांच्यात ‘डोळ्यात डोळे घालून पाहण्यावरून’ वाद झाला होता. याचाच राग मनात धरून यशने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने शनिवारी रात्री अक्षयला गाठले. अक्षयवर तिघांनी मिळून धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अक्षयचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

ताबूत विसर्जनाच्या दिवशीच ही घटना घडल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे, अपर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तातडीने तपास पथक तयार केले.

पथकाने गुप्त माहितीच्या आधारे आरोपी शिरोली एमआयडीसी परिसरात असल्याची माहिती मिळवली. या परिसरात शिताफीने सापळा रचून काळ्या रंगाच्या स्कूटरचा माग काढला. संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पथकाने पाठलाग करून तिघांनाही ताब्यात घेतले.

प्राथमिक चौकशीत, जुन्या वादाचा राग मनात धरूनच अक्षयवर हल्ला केल्याची कबुली आरोपींनी दिली असल्याचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT