दुबई, अबुधाबी, अमिरातला गेलेले 23 पर्यटक सुखरूप 
कोल्हापूर

Israel Iran Conflict: दुबई, अबुधाबी, अमिरातला गेलेले 23 पर्यटक सुखरूप परतले

हुपरीतील 21, पट्टणकोडोलीतील दोघेजण

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर/हुपरी : दुबई, अबुधाबी व अमिरात येथे सहलीला गेलेले हुपरीतील 21 व पट्टणकोडोलीतील दोघेजण, असे 23 जण अबुधाबी विमानतळावरून निघालेल्या पहिल्याच विमानाने सोमवारी रात्री अत्यंत सुरक्षितपणे घरी परतले.

अमेरिका-इस्रायल व इराण या देशांत सुरू असलेल्या युद्धकालीन कालावधीत सर्वजण अबुधाबी विमानतळावर अडकून पडले होते. सर्वजण सुखरूप घरी कधी परतणार, अशी आशा बाळगून देव पाण्यात ठेवून त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या त्यांच्या कुटुंबीयांचा जीव अखेर भांड्यात पडला. त्यासाठी खा. धैर्यशील माने व स्थानिक नगरसेवक रोहित शेटे यांनी भारत सरकारकडे केलेला पाठपुरावा व शिष्टाई कामी आली.

हुपरी व पट्टणकोडोली येथील जोतिराम कणसे, कमल कणसे, राजेंद्र अडवितोट, कांचन अडवितोट, तुकाराम राऊत, छाया राऊत, राजाराम हातकर, सुनीता हातकर, विजय धनवडे, सिंधू धनवडे, शीतल बारगे, जयश्री बारगे, समरजित बारगे, श्रीहरी माळी, प्राजक्ता माळी, प्रशांत माळी, प्रियांका माळी, बाळासो हातकर, सुमन हातकर, सुरेश दराडे, निर्मला दराडे (सर्व रा. हुपरी) व प्रकाश जाधव, सविता जाधव (रा. पट्टणकोडोली), असे सर्वजण 23 फेबुवारीला दुबई, अबुधाबी व अमिरात परिसरातील प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी टूरिस्ट कंपनीच्या माध्यमातून सहलीला गेलेले होते. सहलीचा आनंद लुटून ते परतीच्या प्रवासासाठी दुबई विमानतळावर आले होते. तोपर्यंत युद्ध सुरू झाले. परिणामी, दुबई विमानतळावरून सर्व प्रकारची उड्डाणे बंद करण्यात आली. त्यामुळे सर्व प्रवासी या कालावधीत अबुधाबी विमानतळावरच अडकून पडले होते.

भारत सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावरून युद्धपातळीवर हालचाली करून दुसऱ्या दिवशी अबुधाबी विमानतळावरून भारताकडे विमाने उड्डाण करण्याची परवानगी मिळविली. प्रत्यक्षात युद्ध भडकले असताना जीव मुठीत घेऊन दुबई ते अबुधाबी हा प्रवास करून सर्वजण अबुधाबी विमानतळावर कसेबसे पोहोचले. अमिरात सरकारने झालेला मनस्ताप, गैरसोय व त्रासाबद्दल सर्व प्रवाशांची माफी मागून त्यांना खरेदी करण्यासाठी प्रत्येकी एक हजार दिरहम (भारतीय चलनानुसार 25 हजार 600 रुपये) किमतीचे गिफ्ट व्हाऊचर भेट देत त्यांचा तणाव हलका करण्याचा प्रयत्न केल्याचे या प्रवाशांनी सांगितले. भारत सरकारने नियोजन केलेल्या खास विमानाने हे सर्व प्रवासी सोमवारी रात्री मुंबई विमानतळावर व मंगळवारी सकाळी आपापल्या घरी सुखरूप परतले.

136 नागरिक अद्यापही अडकलेले; 80 उद्या येणार

कोल्हापुरातून दुबई येथे पर्यटनासाठी 159 नागरिक गेले होते. कतार, दुबई, इराण, इस्रायल, मोरोक्को, सौदी अरेबिया, शारजाह, कुवेत, बहरीन आणि ओमान येथे नोकरीनिमित्त गेलेले 39 नागरिक आहेत. कतार, शारजाह व बहरीन येथे नोकरीनिमित्त गेलेल्या कुटुंबातील 7 सदस्य आणि दुबई येथे शिक्षण व प्रशिक्षणासाठी गेलेले 2 असे एकूण 207 नागरिक युद्धजन्य स्थितीमुळे अडकले आहेत. यापैकी पर्यटनासाठी गेलेले 23 नागरिक जिल्ह्यात सुखरूप परतले आहेत.

5 मार्चला 80 नागरिक दुबईहून निघणार असून, ते 6 मार्च रोजी जिल्ह्यात पोहोचतील. यामध्ये दुबईहून हैदराबादला 28, तर मुंबईला 50 नागरिक येणार आहेत. तर, 2 नागरिक मंगळवारी (दि. 3) रात्री उशिरा मुंबईत दाखल होणार आहेत, अशी माहिती प्रसाद संकपाळ यांनी दिली. विशेष विमानाने या नागरिकांना आणले जात आहे.

कोल्हापुरातून आखाती देशांत गेलेले नागरिक

दुबई (पर्यटन 159), कतार, दुबई, इराण, इस्रायल, सौदी अरेबिया, कुवेत, बहरीन, ओमान (नोकरी 39), दुबई (शिक्षण 1), दुबई (नोकरी-प्रशिक्षण 1)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT