Raju Shetti  File Photo
कोल्हापूर

Raju Shetti | देशात २० हजार कोटींचा साखर घोटाळा : राजू शेट्टी

पुढारी वृत्तसेवा

जयसिंगपूर : देशात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही केवळ साठेबाज आणि साखरसम्राटांच्या संगनमताने बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. अवघ्या एका आठवड्यात साखरेचे दर २० रुपयांनी वाढवून ग्राहकांची लूट सुरू आहे. यामागे तब्बल २०,००० कोटी रुपयांचा महाघोटाळा झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला आहे. याची तत्काळ उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

राजू शेट्टी यांनी सरकारी आकडेवारीचा दाखला देत गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. १ नोव्हेंबर ते ३० सप्टेंबरदरम्यान सरकारने २४७ लाख टन विक्रीस परवानगी दिली होती. ३० ऑगस्ट रोजी शिल्लक असलेला ८३ लाख टन साठा सप्टेंबरअखेर थेट ३५ लाख टनांवर कसा आला? म्हणजेच गायब झालेली ४८ लाख टन साखर नेमकी गेली कुठे, असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.

एक तर ही साखर पाकिस्तान, नेपाळ आणि बांगला देशात बेकायदेशीर मार्गाने निर्यात झाली आहे किंवा साठेबाजांनी दाबून ठेवली आहे. अशा स्थितीत केंद्र सरकारने १० लाख टन कच्च्या साखरेच्या आयातीचा घेतलेला निर्णय म्हणजे अपयश झाकण्याचा प्रयत्न आहे. यामुळे आगामी २०२६-२७ च्या हंगामात साखरेचे दर कोसळून ऊस उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. या काळ्याबाजाराची आणि साखर कारखानदारांच्या व्यवहारांची कसून चौकशी करण्यासाठी शेट्टी यांनी पत्राच्या प्रती गृहमंत्री अमित शहा आणि अन्‍न व नागरी पुरवठामंत्री प्रल्हाद जोशी यांनाही पाठवल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT