डॅनियल काळे
कोल्हापूर : पंचगंगा नदी ही जिल्ह्यातील सर्वाधिक प्रदूषित नदी म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. एकेकाळी स्वच्छ व बारमाही वाहणारी ही नदी आज अक्षरशः ‘गटारगंगा’ बनली आहे. दररोज सुमारे 200 एमएलडी सांडपाणी नदीत मिसळत असल्याने पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
2009 पासून सांडपाणी शुद्धीकरणासाठी विविध उपाययोजना सुरू करण्यात आल्या असल्या, तरी त्या अद्याप अपुर्या पडत आहेत. ग्रामीण भाग आणि इचलकरंजीत सांडपाणी प्रकल्प उभा करायला अद्याप शासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. शिरोळ आणि इचलकरंजी परिसरात नदीचे रूपांतर नाल्यात झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
कोल्हापूर महापालिकेने कसबा बावडा (76 एमएलडी) आणि दुधाळी (22 एमएलडी) येथे एसबीआर तंत्रज्ञानावर आधारित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले आहेत. या माध्यमातून सुमारे 100 एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जाते. मात्र, याच्याही दुप्पट सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न होता थेट नदीत सोडले जात असल्याने प्रदूषणाचा धोका वाढत आहे. पूर्वी राजाराम बंधार्यावरून कोल्हापूर शहरासाठी पाणीपुरवठा केला जात होता; मात्र नदीच्या वाढत्या प्रदूषणामुळे तो बंद करावा लागला. सध्या बालिंगा, शिंगणापूर आणि काळम्मावाडी येथून पाणीपुरवठा केला जातो. एकीकडे शुद्ध पाण्याचा उपसा आणि दुसरीकडे नदीत सांडपाणी सोडण्याचा विरोधाभास कायम आहे.
महापालिकेकडून बारा नाले अडवून ते प्रक्रिया केंद्राकडे वळवण्याचे काम तसेच नवीन प्रकल्प उभारणी सुरू असली, तरी कामाचा वेग मंद आहे. त्यामुळे प्रदूषणाचा फटका नदीकाठच्या गावांना बसत असून, आरोग्याचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. या उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याची गरज व्यक्त होत आहे.
दूषित पाण्याने इचलकरंजीकर त्रस्त
इचलकरंजी : ऐन उन्हाळ्यात पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पाणी पातळी खालावल्याने आणि प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे इचलकरंजीकरांना दूषित पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
त्यातच नदीत जलपर्णीचाही विळखा वाढत आहे. पंचगंगा प्रदूषण मुक्तीचा अनेकवेळा नारा देण्यात येतो. प्रत्यक्षात कृती होत नसल्यामुळे इचलकरंजी शहरासह पंचगंगा नदीकाठच्या गावांना दूषित पाणी आणि पर्यायाने आरोग्याच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे.
उपाययोजनांतून प्रश्न लागणार मार्गी
काळ्या ओढ्यातून पंचगंगा नदीत सांडपाणी मिसळत असते. काळा ओढा शुद्धीकरणाचाही प्रयत्न करण्यात आला; मात्र तो औटघटकेचा ठरला आहे. प्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगाने नुकतेच प्रांत कार्यालयात बैठकही झाली आहे. महापालिका व उद्योजकांनी प्रदूषण रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची ग्वाही दिली आहे.