कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीविरोधात ग्रामीण भागात तीव्र विरोध निर्माण झाला आहे. ‘हद्दवाढ विरोधी कृती समिती’ने मंगळवारी (दि. 17) 20 गावांमध्ये बंदची हाक दिली असून निर्णय लादल्यास आगामी जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.
कृती समितीचे अध्यक्ष आणि उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण, उत्तम आंबवडेकर व सचिन चौगुले यांनी पत्रकार परिषदेत सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. एक इंचही जमीन महापालिकेला देणार नाही. हद्दवाढ करायचीच असेल तर कागलपर्यंतची गावे घ्या, असा टोकाचा इशाराही त्यांनी दिला.
मधुकर चव्हाण म्हणाले, 14 जून रोजी सर्किट हाऊस येथे पालकमंत्री प्रकाश आबिटकर व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली होती. यात आमदार चंद्रदीप नरके व आमदार अमल महाडिक यांनी हद्दवाढीबाबत ग्रामीण जनतेला विश्वासात घेण्याची भूमिका मांडली होती. तरीदेखील हद्दवाढ करण्याचा खटाटोप सुरू आहे. तीव्र विरोध असतानाही निर्णय लादण्याचा प्रयत्न अन्यायकारक आहे.
वडणगेचे सचिन चौगले म्हणाले, ज्या नेत्यांच्या मतदारसंघातील गावे हद्दवाढीत येत नाहीत, तेच हद्दवाढीसाठी आग्रही आहेत, तर करवीर व दक्षिण मतदारसंघातील आमदारांनी विरोध केला आहे. हसन मुश्रीफ यांच्या मतदारसंघातील गावे जर हद्दवाढीत समाविष्ट केली, तर खरा समन्वय दिसेल. या पत्रकार परिषदेत संग्राम पाटील, अजय भवड, तानाजी पाटील, अमर मोरे आदींसह ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
शिरोली, नागाव, वळीवडे, गांधीनगर, मुडशिंगी, सरनोबतवाडी, गोकुळ शिरगाव, पाचगाव, मोरेवाडी, उजळाईवाडी, नवे बालिंगे, कळंबे तर्फे ठाणे, उचगाव, वाडीपीर, आंबेवाडी, वडणगे, शिये, शिंगणापूर, नागदेववाडी.
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या बहुप्रतीक्षित हद्दवाढीसंदर्भात मंगळवारी (दि. 17) मुंबईत अत्यंत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीचे मंत्री व आमदार हद्दवाढीच्या प्रस्तावावर निर्णायक चर्चा करणार असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या हद्दवाढीच्या मागणीने आता जोर पकडला आहे. शनिवारी, 14 जून रोजी कोल्हापुरातील सर्किट हाऊस येथे जिल्ह्यातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक पार पडली होती. याच बैठकीत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हद्दवाढीचा तिढा सोडवण्याचा निर्धार करण्यात आला होता. त्यानुसार आजच्या मुंबईतील बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या बैठकीसाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख आमदार उपस्थित राहणार आहेत. हद्दवाढीच्या प्रस्तावाबाबत सरकारची भूमिका सकारात्मक असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते, त्यामुळे या बैठकीत ठोस निर्णय होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर हद्दवाढीचा हा निर्णय अत्यंत कळीचा ठरणार आहे. त्यामुळे या बैठकीतून काय निष्पन्न होते, याकडे केवळ कोल्हापूरच नव्हे, तर संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे.