kolhapur : जिल्ह्यातील 20 टक्के अर्थकारण सावकारांच्या हातात  Pudhari File Photo
कोल्हापूर

kolhapur : जिल्ह्यातील 20 टक्के अर्थकारण सावकारांच्या हातात

काळ्या पैशातून फोफावतोय सावकारीचा वटवृक्ष : सखोल चौकशीची आवश्यकता

पुढारी वृत्तसेवा
सुनील कदम

कोल्हापूर : खासगी सावकारीचे लोण इतके बेफाम वाढले आहे की, काळ्या पैशाची जणू काही एक समांतर अर्थव्यवस्थाच जिल्ह्यात निर्माण झालेली दिसत आहे. जवळपास 20 ते 25 हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल खासगी सावकारीच्या माध्यमातून होत असल्याचा या क्षेत्रातील जाणकारांचा अंदाज आहे.

सावकारीचे तीन स्तर

जिल्ह्यातील सर्व बँका आणि पतसंस्थांची मिळून वार्षिक आर्थिक उलाढाल सुमारे एक ते दीड लाख कोटींच्या घरात आहे. मात्र, खासगी सावकारीच्या माध्यमातून होणारी उलाढाल 25 हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. जिल्ह्यातील सावकारी प्रामुख्याने तीन थर असलेले दिसून येतात. पहिल्या थरात प्रामुख्याने राजकीय क्षेत्राशी आणि गुन्हेगारी वर्तुळाशी निगडीत बड्या बड्या धेंडांचा समावेश आहे. काही उद्योजकही यामध्ये सक्रीय असलेले दिसतात. ही मंडळी थेट सावकारी करत नाहीत, पण आपल्याकडील काळा पैसा सावकारीच्या धंद्यासाठी पुरवताना दिसतात.

या लोकांचे व्याजाचे दर दोन टक्क्यांपासून ते पाच टक्क्यांपर्यंत आहेत. या लोकांकडून कमी व्याजाने पैसे घेऊन तेच पैसे मासिक दहा-पंधरा-वीस टक्क्याने फिरविणारी मंडळी दुसर्‍या थरात येतात, तर या दुसर्‍या फळीकडून पैसे घेऊन ते दाम दसपट दराने सावकारीत लावणार्‍या लोकांचा तिसर्‍या फळीत समावेश आहे. या तिसर्‍या फळीतील लोकांचे व्याजाचे दर दिवसाला दहा टक्के, आठवड्याला दहा टक्के तर कधी कधी महिना दहा ते पन्नास टक्के इतके आहेत. सर्वसामान्य आणि गोरगरीब नागरिक प्रामुख्याने या तिसर्‍या फळीतील सावकारांच्या कचाट्यात अडकलेले दिसतात.

आलिशान राहणीमान

बहुतांश सावकारांचे राहणीमान हे आलिशान स्वरूपाचे आहे. पाच-पन्नास लाखांच्या आलिशान गाड्या, आलिशान बंगले, दररोज चैनीवारी पाच-पन्नास हजारांचा खुर्दा, असे यांचे राहणीमान दिसून येते. बहुतेक सगळ्या सावकारांचा सावकारी हाच मिळकतीचा एकमेव मार्ग आहे. सावकारीतील वार्षिक 20 ते 25 हजार कोटी रुपयांची उलाढाल विचारात घेता सावकारीतील व्याजाच्या माध्यमातून ही मंडळी वर्षाकाठी किमान दोन ते चार हजार कोटी रुपयांची कमाई करताना दिसतात.

शेकडो फार्महाऊस

अनेक सावकारांनी सावकारीच्या माध्यमातून लोकांच्या जमिनी बळकावलेल्या आहेत. अशा जमिनींवर सावकारांचे आलिशान फार्महाऊस थाटलेले दिसते. आजरा, चंदगड, शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड या भागात खासगी सावकारांची शेकडो फार्महाऊस आढळून येतात. नुसती या फार्महाऊसची जरी झाडाझडती घेतली तरी अनेक सावकारांचा पर्दाफाश होईल. पण जिथे शासकीय यंत्रणाच या सावकारांच्या भजनी लागलेली दिसते, तिथे ही चौकशी कोण आणि कशी करणार? हाच मोठा सवाल आहे.

जिल्ह्यातील छोट्या-बड्या बहुतेक सगळ्या खासगी सावकारांचे गुन्हेगारी वर्तुळाशी घनिष्ठ लागेबांधे असलेले दिसून येतात. किंबहुना जिल्ह्यातील बहुतांश गुन्हेगारीचा उगम सावकारीतूनच झालेला दिसून येतो. सावकारीतून मिळणारा बक्कळ पैसा आणि या पैशातून आलेला माज, यामुळे जिल्ह्यातील सावकार दिवसेंदिवस मोकाट सुटताना दिसत आहेत. त्यामुळे खासगी सावकारी ही एक प्रकारची संघटीत गुन्हेगारी समजूनच पोलिस यंत्रणेने ती मोडीत काढण्यासाठी व्यापक मोहीम सुरू करण्याची आवश्यकता नागरिकांतून व्यक्त होत आहे. (समाप्त)

कुठे आहेत ईडी आणि सीबीआयवाले?

आजकाल जरा कुठे काही काळ्या पैशाचा वास आला तरी ईडी आणि सीबीआयच्या धाडी पडताना दिसतात. इथे तर खासगी सावकारीच्या माध्यमातून काळ्या पैशाचा नुसता महापूर वाहताना दिसतो, सर्वसामान्य आणि गोरगरीब जनता या सावकारीच्या महापुरात गटांगळ्या खाताना दिसतेय, पण कधी कुठे सावकारांच्या बंगल्यांवर ईडी आणि सीबीआयच्या धाडी पडल्याचे ऐकीवातसुध्दा येत नाही. आयकर खात्यानेसुध्दा कधी एखाद्या खासगी सावकाराच्या घरावर छापा टाकून बेहिशेबी मालमत्ता जप्त केल्याचे ऐकीवात येत नाही. खासगी सावकारीतील हा काळ्या पैशाचा धूर शासकीय यंत्रणांना कसा काय जाणवत नाही, हासुध्दा एक सवालच आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT