कोल्हापूर

समरजित घाटगे यांच्या पत्नीची 20 लाखांची फसवणूक

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्या पत्नी नवोदिता घाटगे यांची तब्बल 20 लाखांची फसवणूक झाली. मलेशियात पाठविण्यासाठी दिलेल्या पार्सलमध्ये अंमली पदार्थ असल्याची बतावणी करून आणि पासपोर्टही बनावट असल्याचे सांगून संबंधिताने हा गंडा घातला. याप्रकरणी नवोदिता समरजित घाटगे (वय 37, रा. नागाळा पार्क) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 2 ते 5 जून या कालावधीत ही घटना घडली.

नवोदिता घाटगे यांच्या मोबाईलवर 2 जून रोजी फोन आला. संबंधिताने कस्टम अधिकारी असल्याचे सांगून तुम्ही मलेशियात पाठविण्यासाठी दिलेल्या पार्सलमध्ये अंमली पदार्थ आहेत. तसेच तुमच्या नावाचे बनावट पासपोर्ट आणि एटीएम कार्ड आहे. हे गंभीर गुन्हे असून तुमच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, अशी भीतीही संबंधिताने घाटगे यांना घातली.

त्यानंतर काही वेळाने दुसर्‍या दोन वेगवेगळ्या फोनवरून फोन आले. त्यांनी सीबीआयमधील गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी बोलत असल्याचे सांगितले. तसेच तुम्ही गंभीर गुन्हे केले असून त्याबाबत गुन्हा दाखल करून कारवाई करायची नसेल, तर पैसे द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर 20 लाख रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर करण्यास भाग पाडले. परंतु, फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच घाटगे यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानुसार पोलिसांनी अनिल यादव, अजित (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांच्यासह त्या कस्टम अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सर्व रक्कम ऑनलाईन ट्रान्स्फर

नवोदिता घाटगे यांच्या विविध बँकांच्या सेव्हिंग खात्यांतून अनिल यादव, अजित (पूर्ण नाव माहीत नाही) व कस्टम अधिकारी म्हणून बोलणार्‍या व्यक्तीने 2 जूनला सकाळी 9 ते 5 जूनला दुपारी 4.30 या कालावधीत रक्कम काढून घेतली आहे. यात आरटीजीएसद्वारे ही रक्कम वळती करण्यास संबंधितांनी घाटगे यांना भाग पाडले आहे. सर्व रक्कम ऑनलाईन ट्रान्स्फर करून घेतली असल्याने शाहूपुरी पोलिस सायबर क्राईम सेलची मदत घेणार आहे.

SCROLL FOR NEXT