Gold theft: 25 तोळे सोन्याचे दागिने लंपास (Pudhari File Photo)
कोल्हापूर

kolhapur | लग्नघरातून 19 तोळे सोन्याचे दागिने लंपास

रमणमळा परिसरातील बंगल्यातील घटना; शाहूपुरी पोलिसांत फिर्याद

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : लग्नघरात सुरू असलेल्या घाईचा फायदा उठवत 28 लाख रुपये किमतीच्या साडेएकोणीस तोळ्याच्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्याने डल्ला मारला. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली. 31 जानेवारी ते 6 फेब्रुवारीदरम्यान रमणमळा पोस्ट ऑफिसनजीकच्या एका बंगल्यात ही घटना घडली. याबाबतची फिर्याद पुष्पा कुंदन राऊत (वय 49, रा. वानवडी, पुणे) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली.

पुणे येथील पुष्पा राऊत यांची बहीण उज्ज्वला शिंदे या रमणमळा येथे वास्तव्यास आहेत. उज्ज्वला यांच्या मुलाचे लग्न 7 फेब्रुवारी रोजी असल्याने पुष्पा राऊत 31 जानेवारी रोजीच सहकुटुंब कोल्हापुरात आल्या होत्या. त्यांनी 29 तोळे सोन्याचे दागिने सोबत आणले होते. लग्नास 8 दिवस अवधी असल्यामुळे पुष्पा यांनी दागिन्यांची बॅग बहिणीची मुलगी कल्याणी भालकर यांच्याकडे लॉकरमध्ये ठेवण्यासाठी दिली. राऊत यांच्यासह वेदांती डोईफोडे यांनीही दीड तोळे दागिन्यांची पर्स भालकर यांच्याकडे लॉकरमध्ये ठेवण्यासाठी दिली. राऊत कुटुंब एका हॉटेलमध्ये राहण्यासाठी गेले. लग्नाच्या पूर्वसंध्येला राऊत दागिन्यांची पिशवी घेण्यासाठी हॉटेलवरून बहिणीच्या घरी आल्या. लॉकरमधील दागिन्यांची पिशवी घेऊन त्या लग्न समारंभासाठी निघाल्या होत्या. याचवेळी त्यांना वेदांती डोईफोडे यांनी आपल्या दागिन्यांबद्दल विचारणा केली; पण पिशवीत दागिनेच नव्हते. घरामध्ये शोधाशोध केली असता दागिने मिळून आले नाहीत. लग्न पार पडल्यानंतर याबाबतची फिर्याद शुक्रवारी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली.

28 लाखांचे दागिने असे....

पुष्पा राऊत यांचे 28 लाख रुपये किमतीचे दागिने लंपास झाले आहेत. त्यात साडेआठ तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, साडेचार तोळे सोन्याच्या 4 बांगड्या, साडेतीन तोळे दोन तोडे, दीड तोळे टेम्पल हार, अर्धा तोळ्याची अंगठी असे दागिने लंपास झाले. वेदांती यांचे 1 तोळे सोन्याचे झुमके, अर्ध्या तोळ्याची रिंग याचा त्यात समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT