कोल्हापूर : पंचगंगा नदी घाटावरील संस्थान शिवसागर समाधी मंदिर समूहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर असणारा १८ व्या शतकातील शिलालेख. 
कोल्हापूर

Panchganga Ghat | पंचगंगा घाटावरील शिलालेखातून उलगडला १८ व्या शतकातील इतिहास

करवीर छत्रपती संभाजी महाराज दुसरे यांच्या कारकिर्दीचा साक्षीदार

पुढारी वृत्तसेवा

सागर यादव

कोल्हापूर : रयतेचे स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवछत्रपतींचे वंशज करवीर छत्रपती संभाजी महाराज (द्वितीय) यांच्या कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकणाऱ्या शिलालेखाचा उलगडा संशोधकांनी केला आहे. कोल्हापूरची जीवनदायिनी पंचगंगा नदी घाटावरील छत्रपतींच्या संस्थान शिवसागर या समाधी मंदिर समूहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर हा शिलालेख आहे.

इसवी सनाच्या १८ व्या शतकातील १२ ओळींचा देवनागरी लिपीतील हा शिलालेख असून, अनेक वर्षे ऊन-वारा-पावसामुळे त्याच्यावर वातावरणाचा परिणाम झाला असून, लेखातील काही अक्षरे पूर्णपणे पुसट झाली आहेत; तर काही अक्षरे तुटली आहेत. इसवी सन १७६२ च्या सुमारास छत्रपती संभाजी महाराज (करवीर दुसरे) यांच्या कालावधीतील या शिलालेखाचे वाचन संशोधक अनिल किसन दुधाणे व अथर्व पिंगळे यांनी केले. यासाठी त्यांना गणेश नेर्लेकर-देसाई, डॉ. शैलेंद्र भंडारे, चैतन्य अष्टेकर, सचिन पाटील, आशिष कुळकर्णी, वैभवराजे भोसले, बाबली गावडे यांचे सहकार्य लाभले.

शिलालेखातील १२ ओळींचा अर्थ...

‘श्री शंभो’ स्मरणाने लेखाची सुरुवात, नृपती (करवीरकर छ. दुसरे संभाजीराजे) आणि त्यांची पत्नी पार्वती (जिजाबाई) यांचा उल्लेख आहे. पार्वती या शिंदे घराण्यात जन्मलेल्या, सद्‌गुणी, पतिव्रता आणि दोनही कुळांचा मान वाढविणाऱ्या स्त्री होत्या, असे वर्णन आहे. यानंतर त्यांच्या आज्ञाधारक, गुणी आणि कर्तबगार पुत्राचा उल्लेख आहे. त्या पुत्राने आपल्या माता-पित्यांच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून हे कार्य घडवून आणले. ‘येसाजी सरनौबत’ यांचा उल्लेख येतो. त्यांच्या स्मरणार्थ किंवा त्यांच्या प्रेरणेने ‘दारोवठा’ (दरवाजा, प्रवेशद्वार किंवा वेशीचा भाग) बांधण्यात आल्याचे नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT