kolhapur | नृसिंहवाडी नगारखान्यासाठीचे लाकूड ‘जलमार्गाने’ 
कोल्हापूर

kolhapur | नृसिंहवाडी नगारखान्यासाठीचे लाकूड ‘जलमार्गाने’

1867 मधील पत्र उपलब्ध; कृष्णा नदीतून केली वाहतूक

पुढारी वृत्तसेवा

नृसिंहवाडी : श्री नृसिंह सरस्वतींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या नृसिंहवाडीच्या ऐतिहासिक नगारखान्यासाठी वापरण्यात आलेले लाकूड हे कृष्णा नदीतून वाहून आणण्यात आले. लाकडाचे मोठे ओंडके जलमार्गाने आणण्यात आल्यासंदर्भात 1867 मधील पत्र उपलब्ध झाले आहे. त्यातून जल अभियांत्रिकीच्या तत्कालीन वापराचे महत्त्व अधोरेखित होते.

शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पवित्र संगमावर वसलेले हे स्थान ऐतिहासिक घटनांचा एक साक्षीदारही आहे. 1867 च्या सुमारास या मंदिराच्या परिसरातील नगारखान्याच्या बांधकामासाठी झालेली लाकूड वाहतूक हा अभियांत्रिकी द़ृष्टीने एक कुतूहलाचा विषय आहे. या नगारखान्याच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर आणि अतिशय मजबूत अशा लाकडांची आवश्यकता होती.

ही लाकडे बैलगाडीने आणणे अत्यंत खर्चिक आणि कष्टाचे होते. किमान खर्चात सुलभतेने ही लाकडे नियोजित स्थळी आणण्यासाठी जलमार्गाचा वापर करण्यात आला होता. त्याचे ऐतिहासिक पत्र उपलब्ध झाले असून, दि. 3 जानेवारी 1867 रोजीच्या या पत्रात लाकडाच्या प्रवासाचा लेखाजोखा मांडला आहे.

वाहतुकीचे तंत्र

कृष्णा नदीच्या पात्रातून लाकूड वाहून आणण्याचे हे तंत्र वैशिष्ट्यपूर्ण होते. 45 मोठे लाकडी ओंडके, एक दरवाजा कवाड गंधवालसहित व एक लोखंडी आडणा असे एकूण 48 प्रकारचे लाकडी साहित्य कृष्णा नदीचा नैसर्गिक उतार पाहून मिरज, म्हैसाळ, कनवाड, हसूर या गावालगतच्या कृष्णा नदीच्या पात्रातून ही लाकडे वाहून नेण्यात आली. ही लाकडे पोहोचवण्याची जबाबदारी स्थानिक लोकांवर होती. त्यामुळे प्रत्येक वेशीवर ही लाकडे मोजून ती नदी प्रवाहाबरोबर नृसिंहवाडीपर्यंत पोहोचविल्याचे दिसते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT