देवाळे : कुरुकली (ता. करवीर) येथे भरधाव वेगात स्टंटबाजी करत आलेल्या अल्पवयीन चालकाच्या मोटारीने कॉलेज एस.टी. थांब्यावर उभ्या असलेल्या विद्यार्थिनींना चिरडले. गुरुवारी दुपारी सुमारे दीड वाजता झालेल्या या भीषण अपघातात 18 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून, चार विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या आहेत.
प्रज्ञा दशरथ कांबळे (वय 18, रा. कौलव, ता. राधानगरी) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. प्रज्ञा भोगावती महाविद्यालयात बी.एस्सी.च्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होती. गुरुवारी दुपारी महाविद्यालय सुटल्यानंतर भोगावती महाविद्यालयापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या एस.टी. बसथांब्यावर राधानगरी व कोल्हापूरच्या दिशेने घरी जाण्यासाठी पन्नासहून अधिक विद्यार्थी थांबले होते. यावेळी भरधाव वेगात येणार्या मोटारीने विद्यार्थिनींच्या घोळक्यात घुसून जोरदार धडक दिली व फरफटत नेले.
घटनास्थळी गोंधळ निर्माण झाला. अपघातानंतर मोटार थांबवली न गेल्यामुळे विद्यार्थ्यांनी पाठलाग करून भोगावती येथील ठिकपुर्ली फाट्याजवळ मोटार पकडली. मोटारीत असलेली चार अल्पवयीन मुले घटनास्थळावरून पळून गेली. मात्र, अल्पवयीन चालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
अपघातात प्रज्ञा कांबळे हिला गंभीर दुखापत झाली होती. तिला तत्काळ भोगावती येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. जखमी झालेल्या विद्यार्थिनींमध्ये अस्मिता अशोक पाटील (रा. कौलव), श्रावणी उदय सरनोबत (रा. कसबा तारळे), श्रेया वसंत डोंगळे (रा. घोटवडे), पेरणा शिवाजी माने (18, रा. आवळी बु.) यांचा समावेश आहे. या सर्वांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली असून, अधिक तपास सुरू आहे.
ही घटना भोगावती महाविद्यालय परिसरात नेहमी होणार्या स्टंटबाजीचे परिणाम असल्याची चर्चा सुरू आहे. 2018 मध्येही कुरुकली बसस्थानकावर अशाच प्रकारच्या अपघातात दोन विद्यार्थिनींना प्राण गमवावे लागले होते. या पार्श्वभूमीवर भोगावती महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने अध्यक्ष दिगंबर मेडशिंगे यांनी एस.टी. प्रशासनाने कॉलेज मार्गावरूनच बससेवा चालवावी, अशी मागणी केली आहे.
प्रज्ञा दशरथ कांबळे हिचा मृत्यू झाल्याची बातमी कौलव येथे समजताच गावात शोककळा पसरली. तिचे वडील दशरथ कांबळे हे एका माध्यमिक शाळेत शिपाई आहेत, तर आई ग्रामपंचायत सदस्या आहे. त्यांना प्रज्ञा आणि एक मुलगा अशी दोन अपत्ये आहेत. संपूर्ण कुटुंब सर्वांशी मिळून-मिसळून राहणारे आहे.
प्रज्ञा ही बी.एस्सी.च्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होती. ती एक होतकरू, मनमिळाऊ व सार्यांची लाडकी विद्यार्थिनी म्हणून ओळखली जात होती. अपघातानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. तेथे महाविद्यालयीन विद्यार्थी, ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी गर्दी केली होती. तिच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तिच्या मैत्रिणींच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते, तर तिच्या कुटुंबाचा आक्रोश काळीज पिळवटणारा होता.