कोल्हापूर

Kasari Dam: कासारी धरणात १८ टक्के पाणीसाठा; १६ जूनपासून उपसाबंदी जाहीर

अविनाश सुतार

: जून महिना मध्य ओलांडून गेला तरी,  मान्सूनने हजेरी लावलेली नाही. विहिरी, कूपनलिका, ओढे, नाले, नद्या कोरड्या पडल्या आहेत. कासारी धरणाचा (Kasari Dam) पाणीसाठा खालावला असून प्रकल्पात शुक्रवारीअखेर १८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. कासारी धरणातून प्रतिसेकंद २५० क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परंतु पाटबंधारे विभागाने १६ जूनपासून पुढील आदेश येईपर्यंत कासारी नदीकाठी उपसाबंदी जाहीर केली आहे, अशी माहिती कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी दिली. उपसाबंदी जाहीर केल्याने नदीकाठावरील शेतातील उभी पिके पाण्याअभावी करपण्याच्या भीतीने शेतकरी धास्तावला आहे.

विशाळगडसह कासारी (Kasari Dam) खोरा पावसाचे माहेर घर म्हणून ओळखले जाते. दरवर्षी चार ते साडेचार हजार मिमी पावसाची नोंद येथे होते.  यावर्षी पावसाने पाठ फिरविल्याने प्रकल्पातील पाणीसाठा खूपच कमी झाला आहे. उर्वरित लघु प्रकल्पातही जेमतेम पाणीसाठा आहे. 'धरण उशाला कोरड घशाला' अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. कासारी पाणलोट क्षेत्रात कासारी या प्रमुख मध्यम प्रकल्पासह पडसाळी, पोंबरे, नांदारी, कुंभवडे व केसरकरवाडी हे लघू पाटबंधारे प्रकल्प येतात. कासारी प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता २.७५३ टीएमसी आहे. या प्रकल्पामधून शाहूवाडीतील २० तर पन्हाळ्यातील ४१ गावांना कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमधून पाणी मिळते. कासारी नदीवर जागोजागी कोल्हापूर पद्धतीचे १४ बंधारे उभारण्यात आले आहेत. गतवर्षी गेळवडे धरणात  २१ टक्के पाणीसाठा होता. यंदा १८ टक्के आहे.

धरणाची पाण्याची पातळी ६०४.८० मीटर असून उपयुक्त पाणीसाठा १४.०२  द.ल.घ.मी (०.५० टीएमसी) म्हणजेच १८ टक्के इतका आहे. गतवर्षी याच दिवशी पाणीसाठा १६.५१ दलघमी इतका होता. गतवर्षीपेक्षा धरणात तीन टक्के पाणीसाठा कमी आहे. त्यावेळी धरणात (०.५८ टीएमसी) म्हणजेच २१ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. सध्या धरणातून २५० क्यूसेस पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे.
उपसा बंदीने खरीप पिके धोक्यात आली आहेत. उपसाबंदी किती दिवस चालणार, याचीच चर्चा कासारी नदीकाठावरील लोकांची सुरू आहे. पिके वाळण्याच्या आणि उत्पादन घटण्याच्या भीतीने शेतकरी धास्तावला आहे. धरणावर सध्या अक्षरशः एक-एक थेंब पाण्यासाठी काटेकोर नियोजन करण्याची वेळ पाटबंधारे विभागावर आली आहे. सिंचन व जलविद्युत निर्मितीचे नियोजन करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

सध्या पावसाळा लांबणीवर पडला आहे. शेतीसाठी पाण्याची गरज असली तरी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रशासनास सहकार्य करावे. सध्या असलेला पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित ठेवला आहे. सर्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने व योग्य पद्धतीने वापर करणे गरजेचे आहे.

– रोहित बांदिवडेकर, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे कोल्हापूर

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT