कोल्हापूर : भोसलेवाडी-कदमवाडी येथील 18 लाखांच्या लुटीप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी मोटारचालक महेश एकनाथ पाटील (वय 28, रा. पासार्डे, ता. करवीर) याच्यासह साथीदार अभिजित संतोष लोखंडे (वय 27, राजेंद्रनगर, नवीन झोपडपट्टी, कोल्हापूर) अटक केली. न्यायालयाने दोघांना 28 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. 18 लाखांच्या रकमेसह पसार झालेल्या संशयिताचा पोलिस शोध घेत आहेत. शुक्रवारी रात्रीपर्यंत त्याचा सुगावा लागला नव्हता.
शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अन्य दोघा संशयितांकडे चौकशी सुरू आहे. मुख्य सूत्रधाराला अटक केल्यानंतर टोळीचा पर्दाफाश होईल, असे पोलिस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांनी सांगितले. बांधकाम व्यावसायिक राहुल भोसले यांच्याकडे संशयित महेश पाटील चालक म्हणून दोन वर्षांपासून कामाला होता. त्यामुळे भोसले यांच्या आर्थिक उलाढालीची संशयिताला माहिती होती.
संशयित महेश पाटील याने राहुल भोसले यांच्याकडून काही रक्कम हातउसनी घेतली होती. त्यापैकी काही रकमेची परतफेड झाली होती. उर्वरित रकमेसाठी संशयिताने साथीदारासमवेत लुटीचा प्लॅन केला होता. बुधवारी बांधकाम व्यावसायिक भोसले यांचे सुपरवायझर प्रसाद गावडे यांनी बँकेतून 18 लाखांची रक्कम काढून भोसलेवाडीत मालकाच्या घरी पोहोच करण्यासाठी संशयित पाटील याच्याकडे दिली होती.
साथीदारांशी संगनमत करून महेश पाटील याने केलेल्या लूटमारीचा प्लॅन शाहूपुरी पोलिसांनी चव्हाट्यावर आणला. चालकासह दोघांना पोलिसांना बेड्या ठोकल्या असल्या, तरी मुख्य संशयित मात्र लुटलेल्या रकमेसह अजूनही पसार आहे. त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे तपासाधिकार्यांनी सांगितले.