कोल्हापूर : जन्मावेळी गुंतागुंत, वजन कमी, व्यंग, जंतू संसर्ग यासह विविध कारणांमुळे जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत 1,503 शिशूंचा मृत्यू झाला आहे. गतसाली तब्बल 495 शिशू दगावले आहेत. प्रत्येक वर्षी मृत्यू संख्या वाढू लागल्याने मातांनी शिशूंची योग्य काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे बालरोगतज्ज्ञांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.
नवजात बालकांचे संरक्षण करणे अतिशय महत्त्वाचे आहे. जन्मानंतरचे काही आठवडे आणि महिने अनेक कारणांमुळे त्यांच्यासाठी धोकादायक असू शकतात. या काळात नवजात मुलांमध्ये श्रवण, द़ृष्टी आणि संप्रेषण यासह काही महत्त्वपूर्ण हालचाली विकसित होत असतात. मात्र, अनेक अर्भक पोषण, स्वच्छता व पर्यावरणीय परिस्थितीच्या अभावामुळे बळी पडत आहेत. नवजात बालकांचे संरक्षण कसे करावे याची जागृती निर्माण करण्यासाठी 7 नोव्हेंबर रोजी शिशू संरक्षण दिन पाळला जातो. एक सद़ृढ, रोगप्रतिकारक प्रणाली तयार करण्यासाठी जन्मानंतर सुरुवातीच्या महिन्यांत नवजात बाळाला विविध रोगापासून दूर ठेवण्यासाठी बाळाची काळजी घेणे महत्त्वाचे असते. 1990 मध्ये बालमृत्यूबाबत जनजागृती करण्यासाठी आणि अशा समस्यांशी लढण्यासाठी युरोपियन देशांनी शिशू संरक्षण दिन साजरा करण्यास सुरुवात केली. असे असतानादेखील मातांसह नातेवाईकांचा निष्काळजीपणा शिशूंच्या मृत्यूला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका आरोग्य विभागाने शिशू मृत्यू रोखण्यासाठी जनजागृतीवर भर दिला आहे.
जिल्ह्यात शिशूंचा मृत्यू रोखण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग जनजागृती करत आहे. नातेवाईकांनीदेखील दिलेल्या सूचनांचे पालन करावे. शिशू आजारी असेल, तर त्वरित रुग्णालयात दाखल करावे. घरगुती उपचार टाळावेत. तज्ज्ञांद्वारे उपचार घ्यावेत.डॉ. फारूक देसाई, जिल्हा माता, बालसंगोपन अधिकारी