कोल्हापूर : ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करून परिसरात बिबट्या वावरत असल्याचा बनावट फोटो तयार करून तो मोबाईलद्वारे प्रसारित करत लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी वन विभागाने) पाचगाव येथील एका ग्रामस्थाला १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. अशा प्रकारचे कृत्य पुन्हा केल्यास कठोर कारवाईचा इशाराही वन विभागाने दिला आहे.
१६ ऑक्टोबर २०२६ रोजी पाचगाव (ता. करवीर) येथे बिबट्या दिसल्याची खोटी बातमी मोबाईलवरून व्हायरल केली होती. याबाबत ग्रामपंचायत सदस्य सागर दळवी यांनी कळवल्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन चौकशी केली. यावेळी एका अल्पवयीन मुलाने संबंधित फोटो काढून मोबाईलद्वारे प्रसारित केल्याचे समोर आले. चौकशीदरम्यान सुरुवातीला मुलाने बिबट्या खरोखर दिसल्याचे सांगितले. मात्र, नंतर त्याने ‘एआय’च्या मदतीने बिबट्याचा बनावट फोटो तयार केल्याची कबुली दिली.
या प्रकारामुळे नागरिकांमध्ये विनाकारण भीती निर्माण होऊन वन विभागाच्या कामकाजाबाबत दिशाभूल करणारी माहिती पसरवली गेली. त्यामुळे मुलाच्या पालकांना वन विभागाने बोलावून समज दिली. तसेच, वन्यजीवांबाबत चुकीची माहिती प्रसारित केल्याप्रकरणी १५ हजार रुपयांचा उपद्रव दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील आणि सहायक वनसंरक्षक प्रियंका दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली करवीरचे वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे आणि वनरक्षक ओंकार भोसले यांनी केली.
वन्यजीवांबाबत चुकीची माहिती किंवा अफवा पसरवू नये. तसेच तंत्रज्ञानाचा गैरवापर करून दिशाभूल करणारे फोटो तयार करून प्रसारित करू नयेत. अन्यथा कारवाई करण्यात येईल.धैर्यशील पाटील, उपवनसंरक्षक, वन विभाग