15 Year Old Girl Murder | माणगावच्या लेकीसाठी सारा गाव एकवटला अन्‌ अश्रूंचा बांध फुटला  
कोल्हापूर

15 Year Old Girl Murder | माणगावच्या लेकीसाठी सारा गाव एकवटला अन्‌ अश्रूंचा बांध फुटला

पंधरा वर्षीय शाळकरी मुलीचा धारदार शस्त्राने वार करून खून

पुढारी वृत्तसेवा

रूकडी : माणगाव (ता. हातकणंगले) येथे शनिवारी रात्री नऊच्या दरम्यान स्वरा नितीन उपाध्ये (वय १५) या शाळकरी मुलीवर चंद्रप्रभू सांस्कृतिक हॉल परिसरात धारदार शस्त्राने वार करून तिचा निर्घूण खून करण्यात आला. तिला तातडीने इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरने घोषित केले. हातकणंगले पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन संशयित मारेकर्‍याच्या शोधासाठी विविध ठिकाणी पथके दाखल केली. घटनास्थळी जयसिंगपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या.

दरम्यान, रविवारी दुपारी शवविच्छेदन करून मृतदेह गावात आणल्यावर महिला, युवक व अबालवृद्धांच्या अश्रूंचा बांध फुटला. जोपर्यंत संशयिताला पकडले जात नाही, तोपर्यंत मृतदेह हलवला जाणार नाही, अशी महिलांनी भमिका घेतली. यावेळी पोलिस प्रशासन व गावातील ज्येष्ठ नागरिकांनी महिलांची समजूत काढली. गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. गावातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा काढण्यात आली. यामध्ये हजारो नागरिक सहभागी झाले. आ. अशोकराव माने यांनी भेट देऊन या खून प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी व हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे सांगितले .

माणगावचे माजी सरपंच राजू मगदूम यांनीही संशयित नराधमास फाशीची शिक्षा होण्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी व या खटल्यासाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होण्यासाठी माणगाव येथील गांधी चौकात सोमवारपासून युवकांचे आमरण उपोषण करणार असल्याचे जाहीर केले. दरम्यान, गावातील सीसीटीव्ही फुटेजवरून या घटनेतील संशयित अरुण लगमावर (वय ३७) याच्या संशयित हालचाली टिपल्या असून त्याचे फुटेज पुढील तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयित खूनशी स्वभावाचा व मनोरुग्ण असल्याचे बोलले जात आहे. संशयिताच्या घरावर गावातील महिलांनी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला; परंतु तो पोलिसांनी अडवला.

माणगावात कॅन्डल मार्च

माणगाव येथे रविवारी रात्री स्वरा उपाध्ये हिच्या खुनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी कॅन्डल मार्च काढण्यात आला. यामध्ये माणगावातील हजारो लोकांनी सहभाग घेतला. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.

संशयित खुनी जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळून माणगावातील सर्व व्यवहार बंद राहतील, असे माणगावचे माजी सरपंच राजू मगदूम यांनी घोषित केले. यावेळी आमदार अशोकराव माने, जि.प. सदस्य राहुल आवळे, साजणीचे सरपंच शिवाजी पाटील, रुईचे सरपंच अभय काश्मिरे, तिळावणीचे सरपंच दीपक गायकवाड, जिनगोंडा पाटील, रोहन देसाई, अभय व्हनवाडे सुहास राजमाने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT