कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या 68 तसेच पंचायत समितीच्या 136 प्रारूप मतदारसंघावर सोमवारी अखेरच्या दिवसापर्यंत एकूण 141 हरकती दाखल झाल्या. सर्वाधिक 70 हरकती हातकणंगले तालुक्यातील आहेत. दाखल झालेल्या हरकतींवर आता विभागीय आयुक्तांकडे सुनावणी होणार असून दि. 18 ऑगस्ट रोजी अंतिम मतदारसंघ जाहीर होणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या 68 आणि पंचायत समितीचे 136 प्रारूप मतदार संघ सोमवारी (दि. 14) जाहीर करण्यात आले. या मतदारसंघावर हरकत घेण्याची सोमवार, दि. 21 रोजी अखेरची मुदत होती. या कालावधीत जिल्हा परिषदेच्या मतदारसंघावर 128 आणि पंचायत समितीच्या मतदारसंघाबाबत 13 हरकती दाखल झाल्या. सर्वाधिक हरकती हातकणंगेल तालुक्यातून आल्या. हातकणंगले तालुक्यातील दोन मतदारसंघ रद्द झाले असून त्याऐवजी दोन नवे मतदारसंघ अस्तित्वात आले. यामुळे काही मतदारसंघाच्या रचनेत बदल झाल्याने तब्बल 70 हरकती याच तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या मतदारसंघाबाबत आल्या आहेत.
करवीर तालुक्यात एका मतदारसंघाची वाढ झाली आहे, तसेच एका मतदारसंघाचे नाव बदलण्यात आले आहे. यामुळे करवीर तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या मतदार संघावर 36 तर पंचायत समितीच्या मतदारसंघाबाबत 4 हरकती दाखल झाल्या आहेत. कागलमध्येही एक मतदारसंघ नव्याने अस्तित्वात आल्याने अन्य मतदारसंघाच्या रचनेवर काहीसा परिणाम झाला आहे. यामुळे या तालुक्यातूनही जिल्हा परिषदेच्या मतदारसंघावर 9 तर पंचायत समितीच्या मतदारसंघाबाबत एक हरकत आली आहे. आजरा तालुक्यातील एक मतदारसंघ घटला आहे. परिणामी या तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघासाठी 6 तर पंचायत समिती मतदारसंघावर 3 हरकती आल्या आहेत.
चंदगड व राधानगरी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघाबाबत प्रत्येकी 2, भुदरगड तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघाबाबत 2 तर शिरोळ आणि पन्हाळा तालुक्यातून जिल्हा परिषद मतदारसंघाबाबत प्रत्येकी 1 हरकत आली आहे. गडहिंग्लज, गगनबावडा व शाहूवाडी तालुक्यातून एकही हरकत दाखल झाली नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. 18 ऑगस्टला अंतिम मतदारसंघ जाहीर होणार दाखल झालेल्या 141 हरकतींवरील अभिप्रायासह त्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी दि. 28 जुलैला विभागीय आयुक्तांकडे सादर करणार आहेत. या प्रस्तावांनुसार दाखल हरकतींवर विभागीय आयुक्त सुनावणी घेणार आहेत. यानंतर ते दि. 11 ऑगस्टपर्यंत अंतिम निर्णय घेतील. यानंतर हा प्रस्ताव पुन्हा जिल्हाधिकार्यांकडे येईल. जिल्हाधिकारी दि. 18 ऑगस्टला मतदारसंघ अंतिम मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोगाला सादर करणार आहेत.