कोल्हापूर : करवीर पोलिसांनी जप्त केलेली साऊंड सिस्टीम व वाहने.  (छाया : मिलन मकानदार)
कोल्हापूर

DJ Vehicle Seizure | ८ डीजे, ८ ट्रॅक्टरसह १४ वाहने बहिरेश्वर येथे जप्त

करवीर पोलिसांची ८ मंडळांवर कारवाई; २४ जणांवर गुन्हे दाखल

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : श्रीकृष्ण जन्माष्टमी यात्रेत साऊंड सिस्टीमचा दणदणाट करणाऱ्या बहिरेश्वर (ता. करवीर) येथील आठ मंडळांवर करवीर पोलिसांनी रविवारी (दि. ६) धडक कारवाई केली. यामध्ये आठ साऊंड सिस्टीम, ८ ट्रॅक्टर व ६ वाहने जप्त करून आठ मंडळांसह त्यांचे अध्यक्ष, साऊंड सिस्टीम मालक, चालक, ट्रॅक्टर चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. गणेशोत्सवापूर्वी केलेल्या या धडक कारवाईमुळे आगमन मिरवणुकीतील साऊंडच्या दणदणाटाला चाप बसणार आहे.

बहिरेश्वर येथील क्रॅक मेंबर्स, एसपी बॉईज, फेमस ग्रुप, रॉयल क्लब, फार्म हाऊस ग्रुप, एमपी बॉईज, युवा सर्कल ग्रुप आणि पठार किंग ग्रुप या मंडळांवर कारवाई केली. आवाज मर्यादेचे उल्लंघन करणे, ट्रॅक्टरवर फळी टाकून धिंगाणा घालणे, स्ट्रक्चर मर्यादेचे उल्लंघन करणे, सीओटू, प्रेशर मिडसह लेझरच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली.

पोलिसांसमोर धिंगाणा, सौम्य लाठीचार्ज

करवीर पोलिसांनी आवाजाचे नमुने घेताना मंडळाच्या काही सदस्यांनी ट्रॅक्टरवर उभे राहून धिंगाणा घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी ट्रॅक्टरवरून उतरण्याच्या सूचना केल्या. मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.

साऊंडचा दणदणाट भोवला; ८ मंडळांवर गुन्हे

बहिरेश्वर (ता. करवीर) येथील श्रीकृष्ण जन्माष्‍टमीच्या यात्रेत साऊंडचा दणदणाट करणे ८ मंडळांना चांगलेच भोवले आहे. करवीर पोलिसांनी ८ साऊंड, ८ ट्रॅक्टर, ६ वाहने जप्त केली असून २४ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. गणेशोत्सवापूर्वी केलेल्या या धडक कारवाईमुळे आगमन मिरवणुकीतील साऊंडच्या दणदणाटाला चाप बसणार आहे. रविवारी (दि. ६) रात्री ही कारवाई केली. सोमवारी दिवसभर मंडळाचे कार्यकर्ते करवीर पोलिस ठाण्याच्या आवारात थांबून होते.

...तर गणेशोत्सवातही गुन्हे दाखल

गणेशोत्सवात पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. पोलिस प्रशासनाने मंडळांना दोन बेस, दोन टॉपची परवानगी दिली आहे. याचे पालन करून आवाज मर्यादा ओलांडू नये याची दक्षता घ्यावी; अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिला.

यांच्यावर झाला गुन्हा दाखल

युवा सर्कल अध्यक्ष अतुल बंडा चव्हाण, साऊंडमालक दैवत नामदेव मोरे, निचित मारुती आळवेकर, एम. पी. बॉईज अध्यक्ष ओंकार ज्‍योतिराम कांबळे, साऊंडमालक ऋषीकेश राजाराम कोकाटे, ट्रॅक्टरचालक दीप भिकाजी कांबळे, फेमस ग्रुप अध्यक्ष आदर्श बळीराम गुरव, साऊंडमालक अभिजित कृष्णात पाटील, ट्रॅक्टरचालक अक्षय जनार्दन पाटील, क्रॅक मेंबर अध्यक्ष राज रवींद्र दिंडे, साऊंडमालक जॉकी बाबुराव कांबळे, ट्रॅक्टरचालक नितीन निवृत्ती पाटील, फार्म हाऊस मेंबर अध्यक्ष सत्यम सुहास कांबळे, साऊंडमालक शुभम राजाराम आसबे, ट्रॅक्टरचालक ज्‍योतिरादित्य भगवान पाटील, रॉयल क्लब अध्यक्ष आयुष शिवाजी गोसावी, साऊंडमालक सौरभ कृष्णात केणे, ट्रॅक्टरचालक सतेज तानाजी पाटील, पठार किंग अध्यक्ष सागर बाजीराव पाटील, साऊंडमालक रोहन कृष्णात झिरंगे, ट्रॅक्टरचालक नीलेश कृष्णात बचाटे, एस.पी. बॉईज अध्यक्ष आदित्य दत्तात्रय दिंडे, साऊंडमालक श्रीधर सरदार अतिग्रे, ट्रॅक्टरचालक साहिल महादेव काशीद यांच्यावर गुन्हा दाखल झाले.

बांबवडेतही गुन्हा दाखल

मलकापूर : बांबवडे येथे बेकायदा साऊंड सिस्‍टीम लावून कर्णकर्कश आवाजाने ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी संकेत बाजीराव माने (रा. राक्षी, ता. पन्हाळा) व तानाजी पांडुरंग सुतार (रा. ऐनवाडी, ता. शाहूवाडी) या दोघांविरोधात शाहूवाडी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. साऊंड सिस्टीम व वाहन असे दहा लाखांचे साहित्य पोलिसांनी जप्त केले . पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, बांबवडे-कोल्हापूर रोडवरील गुरुकृपा ऑटोमोबाईलजवळ बी. जे. आयवेअर या दुकानासमोर कर्णकर्कश आवाजात साऊंड सिस्‍टीम लावण्यात आली असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ध्वनी प्रदूषणाचे उल्लघंन केल्याप्रकरणी या साऊंड सिस्‍टीम व वाहनावर कारवाई करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT