विशाळगड : ऐतिहासिक विशाळगडावरील अतिक्रमणांवर प्रशासनाने शनिवारी (दि. 31) हातोडा चालवून 14 अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली. पुरातत्त्व, वन आणि महसूल विभागांनी संयुक्तपणेे ही मोहीम 7 तासांत पूर्ण केली. यावेळी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता. प्रशासनाने कारवाईबाबत अत्यंत गोपनीयता पाळली होती.
शनिवारी सकाळी 7 वाजता अतिक्रमण काढून टाकण्यासाठी सर्व यंत्रणा विशाळगडावर हातोडा, टिकाव व अन्य साहित्य घेऊन पोहोचली. त्यांनी तातडीने अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. सुरुवातीला गडावर जाण्याच्या मार्गावरील राजेंद्र कदम यांच्या घराचे अतिक्रमण काढण्यात आले. तेथून ही मोहीम घरे, दुकाने व इतर अतिक्रमणांवर हातोडा घालून ती जमीनदोस्त करेपर्यंत सुरू राहिली. यावेळी गडावरील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.
सकाळी 7 वाजता सुरू झालेली मोहीम दुपारी अडीच वाजता पूर्ण झाली. मोहिमेत 7 रहिवासी घरे, 4 दुकाने आणि 3 इतर अतिक्रमणे काढण्यात आली. कोल्हापूर व शाहूवाडीतून पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला होता, केंबुर्णेवाडीपासून दर्ग्यापर्यंत कडेकोट पोलिस बंदोबस्त होता. सत्तार काशीम म्हालदार, हाफिज युसब शेख, आफरिन रियाज हवालदार, राजेंद्र नारायण कदम, बावाखान अहमद मुजावर, मौलाना खोली, इम—ान अब्दुलगणी मुजावर, शकील मीरासाहेब मुजावर, सुलतान दाऊद म्हालदार, यासीन मुबारक मलंग, शबाना नासीर शहा, केरू कृष्णा भोसले, निजाम मुजावर आणि गणी शेख अशी एकूण 14 अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. मोडतोड झालेले साहित्य तत्काळ मुंढा दरवाजा येथे जमा करून, तेथून क्रेनच्या साहाय्याने गडाखाली आणण्यात आले.
शनिवार असल्याने गडावर पर्यटक आणि भाविकांची गर्दी असते; मात्र कारवाईमुळे केंबुर्णेवाडी येथेच सर्व वाहने रोखण्यात आल्याने गड आणि गजापूर परिसरात शुकशुकाट होता. गेल्या दहा महिन्यांपासून विशाळगडावर पोलिस बंदोबस्त आहे. केंबुर्णेवाडी येथील एकच नाका सुरू असून, चौकशी करूनच गडावर पाठविले जातेे. जिल्हा पोलिसप्रमुखांनी विशाळगडला भेट देऊन अतिक्रमणांची पाहणी केली होती.
अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान पुरातन विभागाचे संचालक विलास वाहने, प्रांताधिकारी समीर शिंगटे, प्रभारी तहसीलदार गणेश लव्हे, वनसंरक्षक कमलेश पाटील, पेंडाखळे वनपरिक्षेत्र अधिकारी सुषमा जाधव, पोलिस उपअधीक्षक आप्पासाहेब पवार, पोलिस निरीक्षक विजय घेरडे आणि रेस्क्यूप्रमुख सुरेश पाटील आदींसह बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
गेल्यावर्षी 14 जुलै रोजी झालेल्या विशाळगडमुक्ती आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. त्यातून विशाळगडाशेजारी मुसलमानवाडी येथे दंगल झाली. तेव्हा संपूर्ण गडासह परिसरात संचारबंदी लागू केली होती. विशाळगड अतिक्रमणाबाबत न्यायालयाने पुरातत्त्व विभागाची सुनावणी घेऊन अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्याचे आदेश देण्याचे निर्देशित केले होते. विशाळगडावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार वारंवार पुढे आली होती.
15 जुलैपासून प्रशासनाने अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली होती. न्यायालयाच्या स्पष्ट निर्देशांनुसार आणि गडावरील पुरातन वारसा जपण्यासाठी प्रशासनाने ही कारवाई सुरू केली आहे. महसूल विभागाचे 40, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि मजूर 80, वन विभागाचे 40, महावितरण 20 असे एकूण असे 180, तसेच पुरातत्त्व, महावितरण, ग्रामपंचायत व वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी व 100 पोलिस अधिकारी, कर्मचार्यांनी या मोहिमेत भाग घेतला.
गडावर एकूण 158 अतिक्रमणे होती, त्यापैकी 94 अतिक्रमणे यापूर्वीच काढण्यात आली होती. उर्वरित 64 पैकी 45 जणांनी न्यायालयीन स्थगिती आणली आहे, तर 10 जणांनी स्वतःहून अतिक्रमणे काढली होती. शनिवारच्या कारवाईमुळे आतापर्यंत 113 अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत.