प्रजाहितदक्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी Pudhari File Photo
कोल्हापूर

Kolhapur News : अहिल्या गीताचे १३८ फूट लांब हस्तलिखित, ७० मंदिरांचा सुवर्ण नकाशा सापडला

अहिल्याबाई होळकरांच्या लोककल्याणकारी कार्याची ऐतिहासिक साधने प्रकाशात

पुढारी वृत्तसेवा

सागर यादव

कोल्हापूर : 'अहिल्या गीता' या नावाने नोंद असलेला सुमारे १३८ फूट लांबीचा हस्तलिखित पट्टा, भागवत पुराणातील कृष्णलीला चित्रे आणि देवी अहिल्याबाई होळकरांनी संरक्षित केलेल्या ७० मंदिरांच्या संरक्षणाचा भारतव्यापी लोककल्याणकारी कार्याचा सुवर्णचित्रित नकाशा असा दस्तऐवजांचा खजिना प्रकाशात आला आहे.

ग्यान भारतम् अभियानांतर्गत हस्तलिखितांच्या रासायनिक संवर्धनाचा आढावा घेत असताना पुरातत्त्व, अभिलेखागार व संग्रहालय विभागाचे आयुक्त मदन नागरगोजे (मूळचे कोल्हापूर रहिवासी) यांच्या विशेष प्रयत्नातून राष्ट्राची संपत्ती असणारा हा अनमोल खजिना खुला झाला आहे. देवी अहिल्याबाईंच्या काळातील श्रद्धा, कला, सुलेखन, चित्रकला आणि लोकजीवन यांचे एकत्रित सांस्कृतिक दर्शन घडविणारा हा खजिना आहे.

हस्तलिखितात अहिल्याबाईंच्या कार्याची माहिती

'अहिल्या गीता' हस्तलिखिताचा पट्टा दि. १५ जुलै १९४४ रोजी हुजूर जवाहरखान्यातून संग्रहात प्राप्त झाल्याची नोंद आहे. सुमारे ४ इंच रुंद आणि १३८ फूट लांब असलेला हा अद्वितीय पट्टा भारतातील संग्रहालयांमध्ये सुरक्षित असलेल्या सर्वात लांब हस्तलिखित पट्ट्यांपैकी एक मानला जात आहे. तांदळाच्या टरफलापासून तयार करण्यात आलेल्या अतिशय हलक्या कागदावर हा पट्टा बनविला असून त्यावर सूक्ष्म अक्षरांत लेखन केले आहे. चित्रांकनात वापरलेला सुवर्णरंग आजही टिकून आहे. संशोधनासाठी संयुक्त संचालक मनीष शर्मा, क्युरेटर श्री महाशब्दे, नम्रता यादव यांनी परिश्रम घेतले.

देशातील ७० मंदिरांचे संरक्षण कार्य प्रकाशात

सुवर्णचित्रित भारताचा नकाशा अहिल्याबाईंच्या कार्याची व्याप्ती सांगणारा महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. अहिल्याबाईंनी भारतातील सुमारे ७० मंदिरांचे पुनरुज्जीवन, दुरुस्ती किंवा संरक्षणकार्य केले. घाट, विहिरी, धर्मशाळा आणि यात्रेकरूंसाठी सार्वजनिक सुविधा उभारल्या. यात काशी विश्वनाथ, गया विष्णुपद, सोमनाथ, द्वारका, बद्रीनाथ, केदारनाथ, हरिद्वार, ऋषिकेश, अयोध्या, प्रयागराज, मथुरा-वृंदावन, चित्रकूट, उज्जैन, ओंकारेश्वर, नाशिक, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, घृष्णेश्वर, पंढरपूर, कोल्हापूर, रामेश्वरम्, श्रीशैलम आणि जगन्नाथ पुरी यांसारख्या प्रमुख तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे. सांस्कृतिक वारशाचे रक्षण, यात्रेकरूंची सेवा, समाजोपयोगी बांधकामे आणि लोकहितकारी प्रशासन असे चौफेर कार्य त्यांनी आपल्या कारकीर्दीत केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT