kolhapur | जुगार अड्ड्यांचे पेव... रोज वाढते उलाढाल, जुगार्‍यांनाही चेव Pudhari File Photo
कोल्हापूर

kolhapur | जुगार अड्ड्यांचे पेव... रोज वाढते उलाढाल, जुगार्‍यांनाही चेव

जिल्ह्यात 135 जुगार अड्डे, 25 कॅसिनो सेंटरवर रात्रंदिवस वर्दळ; पोलिस अधीक्षकांचा आदेश धाब्यावर

अरुण पाटील

दिलीप भिसे

कोल्हापूर : शहर, जिल्ह्यातील काळेधंदेवाल्यांसह तस्करी टोळ्यांचे साम्राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू असताना, झारीतील शुक्राचार्यांकडून मोहिमेला कोलदांडा घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोल्हापूर शहरासह इचलकरंजी, शिरोळ, कुरुंदवाड, हातकणंगले, वडगाव, शहापूर, चंदगड, गडहिंग्लज परिसरात 135 पेक्षा जादा जुगारी अड्ड्यांसह 25 कॅसिनो सेंटरवर जुगार्‍यांची रात्रंदिवस वर्दळ दिसून येत आहे.

पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी पदभार स्वीकारल्यापासून समाजकंटकांविरुद्ध कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. विशेषत:, मटका, जुगारी अड्ड्यांवर सामान्यांच्या होणार्‍या आर्थिक पिळवणुकीविरुद्ध कठोर पावले उचलण्याचे निर्देश जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांतर्गत प्रभारी अधिकार्‍यांना दिले होते. तथापि, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा वगळता जिल्ह्यात एकाही पोलिस ठाण्यातील यंत्रणेमार्फत प्रभावी कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. उलट काही जुगारी अड्ड्यांवरील उलाढालीत वाढ झाल्याचे चित्र आहे.

पोलिस मुख्यालयापासून काही अंतरावर गोळीबार मैदानाजवळील रिकाम्या शेडमध्ये बेधडक सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्याचा नुकताच पर्दाफाश झाला. पोलिसांनी अड्ड्यावर छापा टाकून 48 जणांना जेरबंद केले. रोख रक्कम, 5 लाखांचे मोबाईल, 17 दुचाकींसह सुमारे 15 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याचवेळी लक्षतीर्थ वसाहत परिसरातही जुगारी अड्ड्याचा पर्दापाश झाला. पंधरवड्यापूर्वी महाद्वार रोडवर जिरगे बोळाजवळील जुगारी अड्ड्यावर झालेल्या कारवाईत 35 जणांना ताब्यात घेण्यात आले होते.

शोधायला हवेत झारीतील शुक्राचार्य

इचलकरंजीसह शहापूर, जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड, हातकणंगले, वडगाव परिसरात विशेषकरून ग्रामीण भागात तीन पानी जुगारी अड्ड्यांचे पेवच फुटले आहे. अड्ड्यांवर रात्रंदिवस वर्दळ सुरू असल्याचे चित्र आहे. सीमाभागात गडहिंग्लज, चंदगड येथील निर्जन, माळरानावर जुगार्‍यांच्या उलाढाली सुरू झाल्या आहेत. अर्थात, स्थानिक यंत्रणांना जुगारी अड्ड्यातील उलाढालीची खबरबात नसावी, असे चित्र नाही. झारीतील काही शुक्राचार्यांना हाताशी धरून हा मामला सुरू आहे.

डान्सबारचा असाही सिलसिला!

हातकणंगले तालुक्यात एका गावातील बहुचर्चित फार्महाऊसमधील बेकायदा डान्सबारवर विशेष पोलिस पथकाची झालेली कारवाईही संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे. 15 जुलैला मध्यरात्री छापेमारी झाली. 8 पीडितांची सुटका झाली. 16 जणांना ताब्यात घेण्यात आले. मात्र, कारवाईची खबरबात माध्यमांना लागू नये, याची दक्षता घेण्यात आली. अखेर बातमी चव्हाट्यावर आली. फार्महाऊसवरील कारवाईची गोपनीयता का? आणि कशासाठी? अशी विचारणा होत आहे. अधीक्षकांनीच सत्य उघडकीला आणावे, अशी अपेक्षा आहे.

चोरी-चोरी... छुपके-छुपके!

कॅसिनोचा जुगार केवळ गोव्यात चालतो, असा बोलबाला होता. अलीकडच्या काळात कॅसिनो कोल्हापूर जिल्ह्यातही सुरू झाले आहेत. जयसिंगपूर, शहापूर, शिरोळ, कुरुंदवाड, वडगाव परिसरात 25 ठिकाणी चोरी-चोरी, छुपके-छुपके कॅसिनो सुरू झाले आहेत. विशेषत:, कामगारांची वर्दळ असलेल्या परिसरात कॅसिनो बिनधास्तपणे सुरू झाले आहेत. शहर, जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांचे प्रयत्न असतानाच, दुसरीकडे शहरातील मध्यवर्ती आणि गजबजलेल्या ठिकाणी जुगार अड्ड्यांची उलाढाल सामान्यांचे लक्ष वेधणारी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT