कासारवाडी : मैदानावर मित्रांसोबत खेळता-खेळता अचानक खाली पडलेल्या धनराज राहुल माने (वय १३) याचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. रविवारी खेळताना मैदानावर तो खाली पडला होता. मात्र, आज सकाळी त्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबीय, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांना मोठा धक्का बसला.
सातवीमध्ये शिक्षण घेणारा धनराज रविवार असल्याने गावाबाहेरच्या मैदानावर खेळण्यासाठी गेला असता खेळता खेळता तो पडला. पडल्यानंतर त्याला अंतर्गत रक्तस्त्राव झाला. नंतर उठून तो नेहमीप्रमाणे मैदानावरून घरी आला. रात्री अचानक पोटात दुखू लागल्याने गावातीलच डॉक्टरांना दाखवले असता. सोमवारी सकाळी मोठ्या दवाखान्यात दाखवण्यासाठी म्हणून रात्री घरीच झोपलेला धनराज सकाळी त्याला अधिकच त्रास जाणवू लगला. कुटुंबीयांनी त्याला तत्काळ पेठवडगाव येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. तत्पूर्वी त्याची प्राणज्योत मावळली आणि त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. काल खेळणाऱ्या मुलाचा आज अचानकपणे मृत्यू झाल्याने याचा धक्का कुटुंबीयांना बसला.
सगळ्यात हसरा आणि मनमिळाऊ असणारा धनराज अचानक मृत्यू पावल्याची बातमी अंबपमध्ये पसरल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. त्याच्या पाठीमागे मोठी बहीण, आई-वडील व आजी असा परिवार आहे.