कबनूर; पुढारी वृत्तसेवा : कबनूरमधील ग्रामदैवत मारुती मंदिर परिसरातील कट्ट्यावरील डिजीटल अक्षरांची तोडफोड केल्याची घटना बुधवारी (दि. ७) रात्री घडली. अज्ञात व्यक्तीने केलेल्या या तोडफोडीमुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाले. पोलिसांनी ग्रामपंचायत कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज पहिले असता यामध्ये मनोरुग्णाने हा प्रकार केल्याचे समोर आले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, कबनूर गावात चार महिन्यांपूर्वी उरूस झाला होता. या निधीतून ग्रामपंचायतीने मारुती मंदिराच्या परिसरातील कट्ट्यावर 'आय लव कबनूर' अशी डिजिटल अक्षरे बसवलेले होते. बुधवारी (दि. ७) रात्री अज्ञाताने याची तोडफोड केली. पहाटे स्थानिकांना या प्रकार निदर्शनास आला. ग्रामपंचायत पदाधिकारी, संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या चौकात जमा झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली होती.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी ग्रामपंचायत कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज पहिले असता यामध्ये मनोरुग्णांनी हा प्रकार केल्याचे समोर आले. त्यामुळे या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
एका मनोरुग्णांनी ही तोडफोड केली आहे. या मनोरुग्णाला तात्काळ अटक करून मनोरुग्ण हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. तसेच या मनोरुग्णांनी यापूर्वी देखील गावात तोडफोड केली होती. कोणीही याबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच कोणीही आक्षेपार्ह पोस्ट करू नये असे पोलिसांनी आवाहन केले आहे. अफवा पसरवणारी व्यक्ती आढळून आली, तर त्या व्यक्तीवर कडक कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.