सागर यादव
कोल्हापूर : गो-संरक्षणासाठी केलेल्या शौर्याची साक्ष देणारा पुरातन ठेवा कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात आढळला आहे. कोल्हापूरपासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावरील नाधवडे या गावातील जोतिबा व मरीआई मंदिर परिसरात मध्ययुगातील अत्यंत दुर्मीळ असे दोन ‘गोरक्षक वीरगळ’ उजेडात आले आहेत. पेठवडगाव येथील इंदिरा गांधी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सचिन कोंडेकर आणि महावीर महाविद्यालय इतिहास विभागाचे प्रा. उत्तम वडिंगेकर यांनी या वीरगळांचे संशोधन करून कोल्हापूरच्या मध्ययुगीन इतिहास व तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर प्रकाशझोत टाकला आहे.
गोरक्षक वीरगळाची संकल्पना
प्राचीन काळापासून महाराष्ट्र व कर्नाटक भागात विशेष कामगिरी करताना किंवा शत्रूशी लढताना मृत्यू पावलेल्या योद्ध्यांच्या स्मरणार्थ दगडी स्मारके उभारण्याची मोठी परंपरा होती. अतिशय कठीण बेसाल्ट खडकात कोरलेल्या सुबक अशा स्मारकांना ‘वीरगळ’ म्हटले जाते. वीरगळांचे अनेक प्रकार असले, तरी हल्लेखोर लुटारूंपासून गायी-गुरांचे (गोधन) रक्षण करताना वीरगती प्राप्त झालेल्या योद्ध्यांच्या स्मरणार्थ कोरले गेलेले ‘गोरक्षक वीरगळ’ अत्यंत दुर्मीळ मानले जातात. मिरज-पंढरपूरसारख्या मैदानी प्रदेशात हे वीरगळ मोठ्या प्रमाणावर आढळतात, परंतु बहुतांश डोंगराळ व जंगली प्रदेश असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात असे गोधन संरक्षक वीरगळ दुर्मीळ आहेत. कसबा बीड व बारवेनंतर नाधवडे गावात २ गोरक्षक वीरगळ सापडल्याने इतिहास अभ्यासकांसाठी पर्वणी निर्माण झाली आहे.
असे आहेत गोरक्षक वीरगळ
तळाच्या चौकटीत गायींना पळवून नेणाऱ्या आक्रमकांशी ढाल-तलवार घेऊन लढणाऱ्या वीराचे चित्रण आहे. त्याच्याच शेजारच्या वीरगळामध्ये वीराला अप्सरा पालखीतून स्वर्गात नेतानाचे शिल्प आहे. यावरून हा वीर सैन्यातील उच्चपदस्थ असावा असा अंदाज बांधता येतो. गावाच्या उत्तरेस मरीआई मंदिर प्रवेशद्वाराजवळ सापडलेल्या दुसऱ्या वीरगळात गोधन रक्षणासाठी खंजीरासारख्या शस्त्राने लढा देणारा वीर, मृत्यूनंतर त्याला स्वर्गात नेणाऱ्या अप्सरा, सर्वात वरील चौकटीत शिवलोकात महादेवाच्या पिंडीची सपत्नीक पूजा करणारा वीर कोरला आहे.
सदरचे वीरगळ शिलाहार राजवट (१२ वे शतक) आणि यादव काळच्या सुरुवातीचे असावेत. शिलाहार काळात भुदरगड व रांगणा किल्ल्यांच्या परिसरातून चालणाऱ्या राजवटींच्या सीमा आणि गोधन संपत्तीसाठी होणारी पळवापळवी यातून अनेक संघर्ष घडत असत. यामुळे या अनमोल वारशाच्या जतन व संवर्धनाची आवश्यकता आहे.प्राचार्य डॉ. सचिन कोंडेकर, - प्रा. उत्तम वडिंगेकर, वीरगळ अभ्यासक