गडहिंग्लज : येथील सुभाष टॉकीजजवळील एका मोबाईल शॉपीचा मॅनेजर जमीर इस्माईल मुजावर (रा. साई मंदिर गार्डनजवळ, गडहिंग्लज) याने बनावट आयडी तयार करून 1 कोटी 27 लाख 25 हजार 423 रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद रामदास शिवाजी कुराडे यांनी गडहिंग्लज पोलिसांत दिली.
जुलै 2025च्या ऑडिटच्या दरम्यान 7 ते 8 मोबाईल हँडसेटमध्ये गोंधळ असल्याचे जाणवल्यानंतर याबाबत सखोल चौकशी सुरू केली. यामध्ये मुजावरने काऊंटरला असलेल्या सिस्टीममध्ये मोबाईल हँडसेट व इतर इलेक्ट्रॉनिक साधने असे 74 नग ज्यामध्ये विविध कंपन्यांचे स्मार्ट फोन, टीव्ही व अन्य साहित्य आयडी बदलून विक्री केल्याचे दिसले. अनेक ग्राहकांना बिलिंग सिस्टीममध्ये न देता पेमेंट रोख स्वरूपात घेऊन हे व्यवहार परस्पर केले.
याबाबत मुजावर याला विचारणा केली असता मी पैशांची फिरवाफिरव केली असून, मी ते पैसे वापरले आहेत, हळूहळू देतो, असे सांगून 15 लाख 60 हजार रुपये भरले. मात्र, त्याने एकूण 1 कोटी 27 लाख 25 हजार 423 रुपयांची फसवणूक केल्याचे ऑडिटमध्ये लक्षात आले. याबाबत त्याच्याकडे वारंवार विचारणा करूनही तो पैसे भरत नसल्याने गडहिंग्लज पोलिसांत तक्रार देण्यात आली. पोलिसांनी यातील तांत्रिक बाबी तपासून मुजावर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पल्लवी पोवार करीत आहेत.