Pudhari File Phpto
कोल्हापूर

कोल्हापूर-सांगली महामार्गासाठी 1,192 कोटी

पुढारी वृत्तसेवा

जयसिंगपूर : गेल्या बारा वर्षांपासून वादात अडकलेल्या कोल्हापूर-सांगली महामार्गाचे नशीब अखेर उजाडले आहे. या मार्गाच्या चौपदरीकरणासाठी हायब्रीड एन्युईटी अंतर्गत एक हजार 192 कोटी 84 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे शिरोली (सांगली फाटा) ते चोकाक आणि चोकाक ते अंकली (सांगली) या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम होणार असून हा रखडलेला महामार्ग पूर्णत्वाला जाणार आहे.

कोल्हापूर-सांगली महामार्गाचे काम 2012 पासून बंद आहे. टोल वसुलीवरून निर्माण झालेला वाद 2015 पासून न्यायालयात आहे. दरम्यान अनेक ठिकाणी असलेल्या अपूर्ण कामांमुळे महामार्ग धोकादायक बनला आहे. या मार्गावर होणार्‍या अपघातात अनेकांचे बळी गेले आहेत. महामार्गाचे काम तडीस न्यावे, याकरिता नागरिकांनी वारंवार आंदोलने करून प्रशासनाला जागे करण्याचे काम केले जात आहे. या पार्श्वभूमीवर खा. धैर्यशील माने आणि आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी कोल्हापूर-सांगली हा महामार्ग रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गात विलीन केला. कोल्हापूर-सांगली महामार्गाचे काम करणार्‍या कंपनीला भरपाई देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. रत्नागिरी-नागपूर महामार्गाचे काम गतीने सुरू असून अंकली ते सोलापूर या मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. चोकाक ते आंबा आणि पुढे रत्नागिरीपर्यंतचे काम सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापूर-सांगली महामार्गासाठी निधी देण्याची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. त्यांनीही त्यावेळी ती मान्य करत हा निधी मंजूर केला आहे.

दरम्यान, या महामार्गावरील चोकाक ते अंकलीपर्यंतच्या कामासाठी संपादित होणार्‍या जमीनीला चौपट भरपाई द्यावी अशी मागणी बाधित शेतकर्‍यांनी केली आहे. या मार्गासाठी मोजणीला विरोध करून शेतकर्‍यांनी राष्ट्रीय प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांना परत पाठवले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर चौपट भरपाईबाबत निर्णय होईल, अशी शक्यता होती. मात्र, त्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. तसेच उदगाव बायपासवरून हा महामार्गावरून न्यावा अशी मागणी आहे. त्याबाबतही कोणताही खुलासा केलेला नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT