Kite flying accident | पतंग उडविताना तोल गेला, ओंडक्यांखाली बालकाचा मृत्यू झाला 
कोल्हापूर

Kite flying accident | पतंग उडविताना तोल गेला, ओंडक्यांखाली बालकाचा मृत्यू झाला

पुढारी वृत्तसेवा

आजरा : मकर संक्रांतीच्या उत्साहात असतानाच आजरा शहरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. पतंग उडविताना लाकडी ओंडक्यांचा ढिगारा अंगावर पडल्याने एका 11 वर्षीय शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू झाला. आदर्श किरण पोवार (रा. येरमाळा, जि. धाराशिव) असे या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. सणासुदीच्या दिवशीच ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

धाराशिव जिल्ह्यातील पोवार कुटुंब रोजगाराच्या निमित्ताने गेल्या महिनाभरापासून आजरा शहरात वास्तव्यास आहे. शहरातील एका राईस मिलजवळ त्यांनी लोहार काम सुरू केले होते. बुधवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आदर्शचे वडील काम करत असताना, आदर्श शेजारीच असलेल्या लाकडाच्या ढिगार्‍यावर उभा राहून पतंग उडवत होता. पतंग उडवत असताना अचानक आदर्शचा तोल गेला आणि तो ढिगार्‍यावरून खाली पडला. त्याचवेळी ढिगार्‍यातील जड लाकडी ओंडके त्याच्या अंगावर कोसळले. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने आदर्शचा जागीच मृत्यू झाला.

बहीण थोडक्यात बचावली

घटनेच्या वेळी आदर्श आणि त्याची बहीण दोघेही एकत्र खेळत होते. मात्र, पतंग उडवताना बहीण काही अंतरावर बाजूला गेल्यामुळे ती या अपघातातून सुदैवाने बचावली. आदर्श हा अभ्यासात हुशार होता, त्याच्या जाण्याने एका कष्टकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

आई-वडिलांचा आक्रोश

अपघातानंतर आदर्शचा मृतदेह विच्छेदनासाठी आजरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. आपल्या पोटच्या गोळ्याला अशा अवस्थेत पाहून त्याच्या आई-वडिलांनी केलेला आक्रोश उपस्थितांची मने हेलावणारा होता. या घटनेमुळे आजरा शहरावर शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT