उजळाईवाडी : पाचवी उत्तीर्ण होऊन तो सहावीत गेला. गुरुवारी शाळेचा पहिलाच दिवस, दोनच दिवसांपूर्वी आणलेल्या नव्या वह्या, पुस्तके घेऊन तो सकाळी शाळेत गेला. दुपारी घरी आला. सायंकाळी पाचच्या सुमारास क्लासला जातो म्हणून तो घरातून निघून गेला. रस्त्यावर आलेल्या ओढ्याच्या पाण्यात सायकलसह शिरला अन् बघता बघता तो पाण्याच्या जोरदार प्रवाहाने वाहून गेला. शुक्रवारी सकाळी आठ वाजता, तब्बल 14 तासांनी त्याचा मृतदेह सापडला. क्लास म्हणून तो गेला आणि घरी त्याचा मृतदेहच आला, त्याबरोबरच अमानचा शाळेचा पहिला दिवस अखेरचाच ठरला.
उजळाईवाडीतील दोंदेनगर येथे राहणार्या भालदार कुटुंबावर या घटनेने शोककळा पसरली. जमानुल्ला भालदार यांचा 11 वर्षांचा मुलगा अमान याचा पुराच्या पाण्यात वाहून जाऊन दुर्दैवी मृत्यू झाला. अमान कोल्हापुरातील राधाबाई शिंदे स्कूलमध्ये सहावीत शिकत होता. गुरुवारपासून त्याची शाळा सुरू झाली. शाळेसाठी सकाळी सात वाजता तो घरातून निघून गेला. दुपारी साडेबाराच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर घरी आला.
दुपारी चार वाजता क्लाससाठी तो घरातून बाहेर पडला. सरनोबतवाडी येथून मणेरमळ्याच्या दिशेने तो चालला होता. मात्र, ओढ्याला आलेल्या पुरात तो वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच गांधीनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जिल्हा आपत्ती सुटका दलाचे जवानही आले. त्यांनी शोध सुरू केला. मात्र, अंधार पडल्याने मोहीम थांबवली.
शुक्रवारी सकाळी सहा वाजता पुन्हा शोधमोहीम सुरू केली. यावेळी घटनास्थळापासून अवघ्या 300 फूट अंतरावर ओढ्यालगत असलेल्या विहिरीत अमानचा मृतदेह सापडला. सुनील कांबळे, कृष्णात सोरटे, शुभम काटकर, प्रीतम केसरकर, शैलेश हांडे यांनी शोधमोहीम राबविली.
क्लासला वेळ होईल म्हणून अमन रस्त्यावर आलेल्या ओढ्याच्या पाण्यात सायकलसह शिरला अन् बघता बघता पाण्याच्या जोरदार प्रवाहाने वाहून गेला.