कोल्हापूर : कोल्हापूर शहरात 11 कोटींच्या आणखी एका घनकचरा प्रकल्पाला राज्य शासनाने मंजुरी दिली. झूम परिसरातच हा प्रकल्प होणार आहे. त्याबरोबरच शहरात चार ठिकाणी कचरा संकलन आणि वर्गीकरण केंद्रेही केली जाणार आहेत. त्यामुळे टिप्पर वाहनांच्या फेर्या बंद होणार आहेत. नव्या प्रकल्पामुळे शहरातील कचर्याचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.
शहरात दररोज सुमारे 250 टन कचरा जमा होतो. सुमारे 200 टिप्पर वाहनांच्या माध्यमातून कचरा संकलन केले जाते. टिप्पर वाहनांतून हा कचरा लाईन बझार येथील झूम कचरा प्रकल्पावर टाकला जातो. येथे कचर्यावर प्रक्रिया होते; परंतु संपूर्ण कचर्यावर प्रक्रिया होत नसल्याने सद्यस्थितीत येथे कचर्याचा डोंगर तयार झाला आहे. त्यामुळे महापालिकेने नवीन कचरा प्रकल्पासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता.
टिप्परच्या फेर्या होणार बंद...
सानेगुरुजी वसाहत, फुलेवाडी, आर. के. नगर, शिवाजी विद्यापीठ परिसर आदी शहराच्या टोकाला संकलित केलेला कचरा टाकण्यासाठी टिप्पर वाहने लाईन बझार येथे येतात. परिणामी, दिवसातून एक-दोनच फेर्या होतात. त्यामुळे शहरात चार ठिकाणी कचरा संकलन व वर्गीकरण केंद्रे केले जाणार आहेत. दिवसभर जमा झालेला कचरा डंपरमधून झूम प्रकल्पावर आणून टाकला जाणार आहे. त्यामुळे टिप्पर वाहनांच्या फेर्या बंद होतील.
जागा शोधण्याचे आव्हान
शहरात चार ठिकाणी कचरा संकलन व वर्गीकरण केंद्रे केली जाणार आहेत. मात्र त्यासाठी जागा शोधण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. कारण प्रत्येक ठिकाणी आपल्या भागात कचरा संकलन केंद्र नको म्हणून नागरिकांचा विरोध होत असतो.
हिस्सा असा...
केंद्र शासन : 3 कोटी 66 लाख 95 हजार 688 रु.
राज्य शासन : 4 कोटी 11 लाख 43 हजार 649 रु.
महापालिका : 3 कोटी 33 लाख 59 हजार 716 रु.
एकूण : 11 कोटी 11 लाख 99 हजार 053 रु.