कोल्हापूर

कोल्हापूर : धोकादायक… इमारती 101, वृक्ष 51

Arun Patil

कोल्हापूर, सतीश सरीकर : कोल्हापूर शहरातील तब्बल 101 इमारती आणि 51 वृक्ष धोकादायक बनले आहेत. मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापनांतर्गत शहर अभियंता आणि उद्यान विभागाच्या सर्व्हेतून ही माहिती समोर आली आहे. संबंधित इमारती आणि वृक्षांमुळे दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच वृक्ष हटविण्यासाठी प्राधिकरण समितीसमोर प्रस्ताव ठेवला असून लवकरच मोहीम सुरू केली जाणार आहे.

सर्वाधिक धोकादायक इमारती गावठाण भागात आहेत. विभागीय कार्यालय क्र. 2, छत्रपती शिवाजी मार्केट अंतर्गत तब्बल 68 अशा इमारती आहेत. त्या इमारती धोकादायक आहेत, इतरही इमारतींना धोका पोहोचून जीवितहानी होण्याची शक्यता अधिकारी व्यक्त करत आहेत. महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्र. 3, राजारामपुरी अंतर्गत सर्वाधिक 30 धोकादायक वृक्ष आहेत. राजारामपुरी विभागीय कार्यालयाचा परिसर वृक्षांनी फुललेला असला तरी त्यातील अनेक वृक्ष आता धोकादायक बनले आहेत. पावसाळ्यात कधीही हे वृक्ष कोसळून अपघात होऊ शकतात असा अहवाल आहे. यात जंगली वृक्षांबरोबरच गुलमोहर, आंबा, धावडा, कॅशिया, निलगिरी, बदाम, सिल्व्हर ओक, बर्डचेरी, सिसम, बाभळ, बर्डचेरी आदींचा समावेश आहे.

वृक्ष कोसळल्याने कुटुंब उद्ध्वस्त…

2013 साली पाऊस सुरू असताना बिंदू चौकात एक तरुण आडोसा म्हणून झाडाखाली उभारला होता. त्यावेळी ते झाडच कोसळले. त्यात संबंधित तरुणाचा कंबरेखालील भाग लुळा पडला. त्यामुळे एक कुटुंब उद्ध्वस्त झाले.

SCROLL FOR NEXT