कोल्हापूर : शहरातील खड्डेमय रस्त्यांची दुरवस्था दूर करण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या 100 कोटींच्या रस्ते सुधारणा प्रकल्पाला निधीअभावी मोठा ब्रेक बसला आहे. शासनाच्या मंजुरीनंतर महापालिकेने यामध्ये 30 कोटींचा हिस्सा दिला असून, उर्वरित 70 कोटी रुपये राज्य शासनाने द्यायचे होते. पण आजतागायत केवळ 23 कोटी रुपयांचाच निधी प्रत्यक्षात मिळाल्यामुळे ठेकेदाराने काम थांबवले आहे. प्रकल्पातील एकूण 16 रस्त्यांपैकी 4 रस्त्यांवर कामच झालेले नाही. उर्वरित ठिकाणी रस्त्यांचे काम झाले आहे. काही ठिकाणी गटारीची कामे अपूर्ण आहेत. महत्त्वाचे म्हणजे या कामाची मुदत जून महिन्यात संपणार आहे, अजूनही निधीचा पत्ता नाही.
शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली होती. रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे राज्य शासनाकडे महापालिकेने पाठविलेल्या प्रस्तावानुसार 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. या मंजूर कामाची निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर सोलापूरच्या ‘एव्हरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर’ या कंपनीला कामाचा ठेका मिळाला. या कंपनीने 16 पैकी 12 ते 13 रस्त्यांवर कामांना सुरुवात करून यापैकी बहुतांश कामे पूर्ण केली आहेत. परंतु या कामासाठी आजवर केवळ 23 कोटी रुपयांचा निधीच मिळाला आहे. उर्वरित निधी आणि ठेकेदार कंपनीने केलेल्या कामाचे पैसेही मिळाले नसल्याने ठेकेदार कंपनीने कामे बंद केली आहेत. परिणामी, रस्ते कामांचा खोळंबा झाला आहे. निधी नाही म्हणून रस्त्यांची कामे थांबली आहे.
शंभर कोटींच्या या रस्ते कामांपैकी पूर्वेकडील एका महत्त्वाच्या रस्ते कामात महापालिकेच्या एका माजी पदाधिकार्याने खोडा घातला आहे. रस्त्याच्या तोंडावरच हॉटेलचा काही भाग अनधिकृत आहे. पण ते बांधकाम अधिकृत असल्याचा त्यांचा दावा आहे. हे बांधकाम काढून घेण्यास टाळाटाळ होत असल्याने, सुमारे पाच कोटी रुपयांच्या हा रस्ता खोळंबला आहे. निधी खर्च झाला आहे. ठेकेदाराकडून काही कामे केली आहेत. परंतु त्याचे बिल मिळालेले नाही. शासनाने निधी दिलेला नाही. त्यामुळे उर्वरित रस्ते होतील की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.