कागल : घरावर सोलर पॅनल बसवून जादा अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवून करनूर (ता. कागल) येथील चौघांसह हेरवाड (ता. शिरोळ) येथील एकाची दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कागल पोलिसांत तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी चंद्रकांत हिंदुराव पाटील (रा. करनूर), पीयूष कृष्णलाल व्यास आणि बरोत आरजू महेशभाई (दोघेही रा. मेहसाणा, गुजरात) यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, सतीश सखाराम सांगावकर, संभाजी गुंडू पाटील, जयसिंग सुरेंद्र चौगुले आणि तानाजी आत्माराम शिंदे (सर्व रा. करनूर) तसेच राजेंद्र मारुती मस्के (रा. हेरवाड, ता. शिरोळ) यांना संशयितांनी घरावर सोलर पॅनल बसवून देण्याबरोबरच वीज बिल बंद करून जादा अनुदान मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
त्यासाठी प्रत्येकाकडून दोन लाख रुपये घेऊन ते एमएचजे फाऊंडेशन डॉट इन, मेहसाणा (गुजरात) येथील बँक खात्यावर जमा करण्यास सांगितले. अशाप्रकारे संगनमताने पाच जणांकडून एकूण दहा लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार एक डिसेंबर २०२५ ते १० जानेवारी २०२६ या कालावधीत करनूर येथे घडली. याबाबत सतीश सांगावकर यांनी कागल पोलिसांत फिर्याद दिली आहे.