Ichalkaranji Textile Industry | ५०० कोटी रुपयांचे उत्पादित कापड पडून  
कोल्हापूर

Ichalkaranji textile industry | ५०० कोटी रुपयांचे उत्पादित कापड पडून

प्रक्रियेसाठी तयार १० कोटी, तर प्रक्रियेच्या प्रतीक्षेत; १० कोटी मीटर कापड राजस्थान व इचलकरंजीत

पुढारी वृत्तसेवा

इचलकरंजी : राजस्थानातील प्रोसेस हाऊस बंद असल्‍याने इचलकरंजीतून प्रोसेसिंगसाठी पाठवलेले १० कोटी मीटर कापड राजस्थानात पडून आहे. प्रोसेस हाऊस सुरू होतील, या आशेवर उत्पादित सुमारे १० कोटी मीटर कापड प्रोसेसिंगसाठी तयार आहे; मात्र प्रोसेस सुरू न झाल्यामुळे सुमारे २० कोटी मीटर कापड प्रोसेसिंगच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे सुमारे ५०० कोटी रुपयांचे उत्पादित कापड प्रक्रियेविना राजस्थान व इचलकरंजीत पडून आहे.

इचलकरंजी शहरात सुमारे ३० हजार साधे यंत्रमाग आहेत. या यंत्रमागावर प्रामुख्याने पॉपलिन व मलमल कापडाचे उत्पादन घेतले जाते. परकर, पेटीकोट आदींसाठी पॉपलिनचा, तर अस्तरसाठी मलमलचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. इचलकरंजी शहरात साधारण ७५ ते १०० प्रोसेसिंग हाऊस आहेत. या ठिकाणी काही प्रमाणात प्रोसेसिंगचे काम केले जाते; मात्र प्रदूषणाच्या कारणावरून आंदोलनामुळे जवळपास दोन ते अडीच महिने उद्योग बंद आहेत. राजस्थानात जवळपास ८०० ते ९०० प्रोसेस हाऊस आहेत. इचलकरंजी शहरातील बहुतांश कापड प्रोसेसिंगसाठी त्या ठिकाणी जाते. पाच महिन्यांपासून प्रदूषणाच्या कारणातून या ठिकाणचे प्रोसेसिंग हाऊस पूर्णपणे बंद आहेत. इचलकरंजी शहरात साधारण दररोज ३० लाख मीटर कापडाचे उत्पादन होते. त्यामुळे दरमहा साधारण ७५० लाख मीटर कापड उत्पादन घेतले जाते. प्रोसेस हाऊस बंद होण्यापूर्वी साधारण इचलकरंजीतून १० कोटी मीटर कापड पाली, बालोतरासह जोधपूरमध्ये प्रोसेसिंगसाठी गेल्याचे उद्योजकांकडून सांगण्यात आले.

ऐन सणातही आर्थिक फटका?

गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, दसरा आणि दिवाळी हे सण तोंडावर आले आहेत. या काळात कापडाला मोठी मागणी असते. प्रोसेसिंग हाऊस सुरू झाल्यानंतही वस्त्रोद्योग पूर्ववत व्हायला दिवाळी उजाडेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे प्रोसेस हाऊस बंदचा फटका ऐन सणांच्या काळातही वस्त्रोद्योगाला आणि पर्यायाने यंत्रमागधारकांना सहन करावा लागणार आहे

न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष

या परिस्थितीतही यंत्रमागधारकांनी उत्पादन सुरूच ठेवले होते. दीड महिन्यात साधारण १० कोटी मीटर कापड उत्पादन झाले आहे; मात्र प्रोसेसिंगअभावी कापड गोदामातच आहे. महाराष्ट्र सरकारकडून राजस्थानमधील प्रोसेस हाऊस सुरू व्हावेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत; मात्र न्यायप्रविष्ट बाब बनल्याने सुनावणी होऊन निर्णय कधी होणार, याकडे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT