कोकण

सिंधुदुर्ग: सावंतवाडीचे सुपुत्र अ‍ॅड. राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी; सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा

मोनिका क्षीरसागर

सावंतवाडी; पुढारी वृत्तसेवा: शिंदे सरकारच्या पहिल्या विशेष अधिवेशनात रविवारी विधानसभा अध्यक्ष निवड करण्यात आली. या अध्यक्ष पदाची माळ भाजपचे कुलाबा येथील आमदार अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांच्या गळ्यात पडली. अ‍ॅड.राहुल नार्वेकर हे सावंतवाडीचे सुपुत्र असून यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे.

अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांचे कुटुंब मूळ गोवा राज्यातील नार्वे येथील असले तरी अनेक पिढ्यांपासून हे कुटुंब सावंतवाडीत स्थायिक झाले आहे. सावंतवाडी -सालईवाडा येथे त्यांचा 'सरस्वती' नावाचा बंगला असून, त्यांचे वडील सुरेश नार्वेकर हे कुटुंबीयांसमवेत तेथे वास्तव्यास आहेत. जुन्या सावंतवाडी पंचायत समिती इमारतीच्या बाजूला हा बंगला आहे. त्यांचे भाऊ अश्‍विन नार्वेकर हे एमबीए असून स्वतः अ‍ॅड. राहुल नार्वेकर हे कुलाबा येथील भाजपचे आमदार आहेत. तर त्यांचे दुसरे भाऊ अ‍ॅड. मकरंद नार्वेकर हे मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक आहेत. वडील सुरेश नार्वेकर हेदेखील कुलाबा प्रभागातून शिवसेनेचे नगरसेवक होते. त्यामुळे नार्वेकर कुटुंबाला राजकारणाची परंपरा व वारसा आहे.

अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेतून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत विधानपरिषदेत निवडून आले. तीन वर्षे ते राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे सदस्य होते. मात्र, 2019 च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यानंतरते कुलाबा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. आता शिंदे सरकारमध्ये त्यांना विधानसभेचे अध्यक्ष हे सर्वोच्चपद मिळाले आहे.सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा येथे त्यांची शेती- बागायती आहे. तर वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड येथील श्री देवी सातेरी हे त्यांचे कुलदैवत आहे. अ‍ॅड. नार्वेकर हे अनेक वेळा सावंतवाडीत घरी वास्तव्यास असतात. मे महिन्याच्या हंगामात ते आवर्जुन सावंतवाडी येथे येतात. सावंतवाडीच्या सुपुत्राला विधिमंडळातील सर्वोच्चपद प्राप्त झाल्याने सावंतवाडीवासीयांनी देखील आनंद व्यक्‍त केला आहे.

अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांचे वडील सुरेश नार्वेकर यांचे जवळचे मित्र ज्ञानू बांदेकर यांच्याकडे त्यांच्या बंगल्याच्या चाव्या असतात. त्यांनाच सोबत घेवून ते आंबोली, आरोंदा किंवा मातोंड येथे जातात. विशेष म्हणजे ज्ञानू बांदेकर हे हनुमानभक्‍त असून, सावंतवाडी शहरातील नरेंद्र डोंगर येथे असलेल्या मारुती मंदिरामध्ये ते सेवेकरी आहेत. दर शनिवारी या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. यामध्ये ज्ञानू बांदेकर तसेच बांदेकर कुटुंबीयांचा मोठा सहभाग असतो. माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी अ‍ॅड. नार्वेकर यांच्या रुपाने सावंतवाडीच्या सुपुत्राला महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष पदाचा बहुमान मिळाल्याबद्दल आनंद व्यक्‍त केला. मा

जी नगराध्यक्ष अ‍ॅड. दिलीप नार्वेकर यांचे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घराण्याचे जवळचे संबंध आहेत. त्यांचा भाऊ रमेश नार्वेकर आणि अ‍ॅड. दिलीप नार्वेकर हे दोघेही कॉलेजमध्ये वर्गमित्र होते. 1965 मध्ये ते एकत्र शिकले. पदवीची काही वर्षे रमेशनार्वेकर यांनी सावंतवाडी श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतले आणि नंतर ते मुंबईमध्ये पुढील शिक्षणासाठी गेले. राहुल नार्वेकर यांच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. दिलीप नार्वेकर यांनीही आनंद व्यक्‍त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT